होत्याचे नव्हते झाले, पावसाच्या पाण्यात १५ एकर सोयाबीन गेले वाहून

By आशपाक पठाण | Published: July 10, 2024 07:04 PM2024-07-10T19:04:48+5:302024-07-10T19:07:32+5:30

कृषी विभागाकडून पाहणी : पंचनामा करून नुकसान भरपाईची मागणी

15 acres of soybeans were washed away by rainwater | होत्याचे नव्हते झाले, पावसाच्या पाण्यात १५ एकर सोयाबीन गेले वाहून

होत्याचे नव्हते झाले, पावसाच्या पाण्यात १५ एकर सोयाबीन गेले वाहून

लातूर : तालुक्यातील कानडी बोरगाव शिवारात ८ जुलै रोजी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे अनेकांच्या शेतातील उभे पीक वाहून गेले आहे. तर काही शेतकऱ्यांच्या पिकात पाणी जमा झाल्याने सोयाबीनचे नुकसान झाले आहे. पावसाच्या पाण्यात नुकसान झाल्याने महसूल विभागाने पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

लातूर तालुक्यातील कानडी बोरगाव, टाकळगाव, तांदुळजा, सारसा शिवारात ८ जुलै रोजी जोरदार पाऊस झाला. या पावसात अनेकांच्या पिकात पाणी थांबल्याने पिके पिवळी पडली आहेत. तर काही शेतकऱ्यांचे पीकच वाहून गेले आहे. कानडी बोरगाव शिवारात जमीन असलेल्या टाकळगाव येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात गट नंबर ३३, ३४, ३६ व ३७ मधील शेतकऱ्यांचे सोयाबीन वाहून गेले असून शेतकरी उध्दवराव कदम, सिताराम कदम, साहेबराव जाधव, युवराज कदम, उत्तम कदम यांचे जवळपास १५ ते १८ एकरावरील पिकाचे नुकसान झाले. याबाबत तलाठी, कृषी सहाय्यक यांना माहिती दिल्यावर बुधवारी कृषी सहाय्यक माळी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. तसेच नुकसानीची माहिती घेतल्याचे शेतकरी उध्दव कदम यांनी सांगितले.

दरवर्षी पावसाच्या पाण्यात नुकसान...
पावसाळ्यात दरवर्षी या गटातील पिकांत पाणी जमा होते. या भागातून वाहणारे कानडी बोरगाव तांडा शिवारातून खाली मांजरा नदीपाकडे जाते. पावसाळ्यात या पाण्याचा वेग अधिक असल्याने दरवर्षी मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यंदाही नुकतीच पेरणी झालेले सोयाबीन पूर्णत: वाहून गेले आहे. यात लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी सिताराम कदम, साहेबराव जाधव, उध्दव कदम यांनी सांगितले.

Web Title: 15 acres of soybeans were washed away by rainwater

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.