मोबाईल चोरांकडून चाेरीचे १५ माेबाइल जप्त; आता तक्रारदारांचा शाेध !
By राजकुमार जोंधळे | Published: June 8, 2023 07:09 PM2023-06-08T19:09:46+5:302023-06-08T19:10:02+5:30
पाेलिसी खाक्या दाखविताच गुन्ह्यांची कबुली
लातूर : शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलिस ठाण्यांच्या हद्दीतून माेबाइल हिसकावणे, जबरी चाेरी करून राेकड, माेबाइल पळविण्याच्या घटना गत काही दिवसांपासून वाढल्या आहेत. टाेळीतील तिघांना सिनेस्टाइल पाठलाग करीत लातूर पाेलिसांनी पकडले आहे. त्यांच्याकडून जवळपास १५ माेबाइल जप्त केले आहेत; मात्र हे माेबाइल काेणाचे आहेत? त्या तक्रारदारांचा शाेध पाेलिस घेत आहेत.
लातूर शहरातील वेगवेगळ्या मार्गांवर, रिंगराेडवर, माॅर्निंग वाॅकला जाणाऱ्या वयाेवृद्ध, कानाला माेबाइल लावून बाेलत जाणारे, लहान मुले यांच्या हातातील माेबाइल हिसकावत पळ काढणाऱ्या आंतरजिल्हा टाेळीतील चाैघांना विवेकानंद चाैक ठाण्याच्या पथकाने पाठलाग करीत माेठ्या शिताफीने लातुरात नवीन रेणापूर नाका परिसरात पकडले. त्यांना पाेलिसी खाक्या दाखविताच चाेरीतील जवळपास १५ माेबाइल पाेलिसांच्या हाती लागले. तक्रारदारच पुढे येत नसल्याने पाेलिसांची अडचण झाली असून, त्यांचा शाेध सुरू आहे.
काही हजारांत माेबाइलची विक्री...
लातूरसह जिल्ह्यातील विविध ठिकाणांहून जबरी चाेरी, वाटमारी करून, रस्त्यात वाहन अडवून मारहाण करणे, त्यांच्याकडील माेबाइल, राेकड पळविण्याच्या घटना घडल्या आहेत. चाेरीतील माेबाइल काही हजार रुपयांत विक्री करणाऱ्या मध्यस्थांनाही पाेलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिवाय, चाेरीतील माेबाइल खरेदी करणाऱ्या संशयितांचीही चाैकशी केली जात आहे.
चाेरीचे माेबाइल खरेदी करणे अंगलट...
चाेरीतील दुचाकी, माेबाइल खरेदी करणे हे काहींच्या चांगलेच अंगलेट आले आहे. चाेरट्यांच्या माहितीनुसार काही हजार रुपयांत दुचाकी, माेबाइल खरेदी करणाऱ्याच्या दारावर पाेलिस धडकल्याने त्यांना घामच फुटला. त्यांनी माेबाइल पाेलिसांकडे सुपूर्द केला आहे; मात्र चाैकशीचा ससेमिरा त्यांची पाठ साेडायला तयार नाही. चाेरीतील माेबाइल खरेदी करणे अनेकांच्या अंगलट आले आहे.