माथाडी कामगारांच्या संपामुळे १५ कोटींची उलाढाल ठप्प

By हरी मोकाशे | Published: February 24, 2024 05:11 PM2024-02-24T17:11:41+5:302024-02-24T17:12:32+5:30

राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश आहे.

15 crore turnover stopped due to the strike of Mathadi workers | माथाडी कामगारांच्या संपामुळे १५ कोटींची उलाढाल ठप्प

माथाडी कामगारांच्या संपामुळे १५ कोटींची उलाढाल ठप्प

लातूर : हमालीच्या दरात वाढ करावी, या प्रमुख मागणीसाठी लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांनी शुक्रवारपासून बेमुदत संप सुरू केला आहे. परिणामी, जवळपास १५ कोटींची उलाढाल ठप्प झाली असून, बाजार समितीत शुकशुकाट दिसून येत होता. त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये लातूर उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीचा समावेश आहे. सध्या रब्बी हंगाम संपत आल्याने बाजार समितीत हरभरा, तूर आणि सोयाबीनची सर्वाधिक आवक असून, त्यापाठोपाठ गहू, ज्वारी, बाजरी, करडई आदी शेतमालाची आवक होत आहे. दररोज साधारणत: २० हजार क्विंटलपर्यंत आवक होत आहे. शेतीमालाला योग्य भाव मिळण्याबरोबरच वेळेवर पट्टी मिळत असल्याने शेतकऱ्यांचा लातूर बाजार समितीकडे ओढा कायम आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात घसरण झाल्याने स्थानिक बाजारातही सोयाबीनचे भाव उतरले आहेत.

हमालीच्या दरावरून कामगारांत असंतोष...
बाजार समितीतील हमालांना प्रतिक्विंटलमागे १० रुपये ३६ पैसे अशी हमाली मिळते. त्याची शेतकऱ्यांच्या बिलात आकारणी करण्यात येते. तसेच व्यापाऱ्यांकडे काम करणाऱ्या हमालांना पोत्याचे तोंड लावण्यासाठी १ रुपये ९० पैसे, तर वाहनात पोते भरण्यास ४ रुपये ५५ पैसे देण्यात येते. यासंदर्भातील करार १ जून २०२० रोजी संपुष्टात आला आहे. तेव्हापासून हमालीचे दर वाढविण्यात यावेत म्हणून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, साडेतीन वर्षांपासून वाढ करण्यात आली नसल्याने माथाडी कामगारांत असंतोष निर्माण झाला. त्यातून शुक्रवारपासून जवळपास १६०० कामगारांनी बेमुदत संप सुरू केला आहे.

लवकरच निर्णय होईल...
हमालीचा दर वाढविण्यासंदर्भात राज्यातील इतर बाजार समितींतील माहिती मागविण्यात आली आहे, तसेच हा प्रश्न जिल्हा उपनिबंधक, कामगार कल्याण कार्यालयाच्या अखत्यारितील आहे. हा तिढा सोडविण्यासाठी बाजार समिती प्रयत्न करीत आहे. लवकरच निर्णय होईल.
- जगदीश बावणे, सभापती, बाजार समिती.

जिल्हा उपनिबंधकांच्या निर्णयाकडे लक्ष...
हमाली दरवाढीसंदर्भात गुरुवारी बैठक घेण्यात आली. त्यात सर्वांनी सकारात्मक भूमिका दर्शविली. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधकही सकारात्मक आहेत. आता त्यांच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे. लवकरच व्यवहार सुरू होतील.
- भगवान दुधाटे, सचिव, बाजार समिती.

महागाईनुसार दरवाढ व्हावी...
माथाडी कामगारांना महागाईनुसार हमालीच्या दरात वाढ मिळावी. त्यासाठी गेल्या साडेतीन वर्षांपासून पाठपुरावा करीत आहोत. मात्र, बाजार समितीकडून प्रतिसाद मिळत नाही. दरवाढ झाल्यास आम्ही काम करण्यास तयार आहोत.
- बालाजी जाधव, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार ट्रान्सपोर्ट ॲण्ड जनरल कामगार युनियन.

Web Title: 15 crore turnover stopped due to the strike of Mathadi workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर