पदभरतीच्या शुल्कापोटी लातूर जिल्हा परिषदेच्या तिजोरीत दीड कोटी
By हरी मोकाशे | Published: September 6, 2023 06:20 PM2023-09-06T18:20:14+5:302023-09-06T18:20:40+5:30
विविध ४७६ जागांसाठी एकूण १७ हजार ७४२ अर्ज दाखल
लातूर : जिल्हा परिषदेतील विविध विभागांतील ४७६ जागांसाठी एकूण १७ हजार ७४२ अर्ज ऑनलाईनरित्या दाखल झाले आहेत. विशेषत: पदभरतीच्या शुल्कापोटी जिल्हा परिषदेच्या खात्यावर १ कोटी ६१ लाख रुपये जमा झाला आहेत. आता उमेदवारांचे परीक्षेकडे लक्ष लागून आहे.
विविध कारणांमुळे बऱ्याच महिन्यांपासून राज्यातील जिल्हा परिषदेची भरती प्रक्रिया लांबली होती. त्यामुळे युवकांचे लक्ष लागून होते. दरम्यान, राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये क वर्गातील पदे सरळ सेवेने भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. लातूर जिल्हा परिषदेतील ४७६ पदांसाठी एकूण १७ हजार ७४२ अर्ज दाखल झाले आहेत. विशेषत: उच्चशिक्षित उमेदवारांनी अर्ज दाखल केले असल्याचे पहावयास मिळत आहे. अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचे निवड परीक्षा कधी होते याकडे लक्ष लागून असल्याचे पहावयास मिळत आहे. दरम्यान, या भरतीसाठी १९७ दिव्यांगांचे तर ३०९ माजी सैनिकांच्या पाल्याचे अर्ज दाखल झाले आहेत. १० हजार ६९४ जणांनी परीक्षेसाठी लातूर हे केंद्र निवडले आहे तर ७ हजार ४८ जणांनी परजिल्ह्यातील केंद्र निवडले आहे.
नियमित जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ पहा...
जिल्हा परिषदेच्या ४७६ जागांसाठी एकूण १७ हजार ७४२ अर्ज दाखल झाले आहेत. या परीक्षा ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे. परीक्षेसंदर्भात उमेदवारांना कळविले जाणार नाही. त्यामुळे अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांनी नियमितरित्या जिल्हा परिषदेचे संकतेस्थळ पहावे. त्यावरच सूचना करण्यात येणार आहेत.
- नितीन दाताळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन.
एका जागेसाठी ३८ अर्ज दाखल...
गट क मधील जागांसाठी ही पदभरती होणार आहे. साधारणत: एका जागेसाठी जवळपास ३८ अर्ज दाखल झाले आहेत. त्यातही कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (विद्युत), लघुलेखक, विस्तार अधिकारी अशा काही पदांसाठी सर्वाधिक अर्ज दाखल झाले आहेत. पदाच्या शुल्कापोटी जिल्हा परिषदेच्या खात्यावर १ कोटी ६१ लाख रुपये जमा झाले आहेत.
आदेश मिळताच त्या उमेदवारांना पैसे परत...
सन २०१९ मध्ये जिल्हा परिषदेतील गट क संवर्गातील सरळ सेवा भरती प्रक्रियाठी अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, परीक्षा न झाल्याने शासनाकडून ६५ टक्के पैसे उपलब्ध झाले आहेत. उर्वरित ३५ टक्के रक्कम येणे शिल्लक आहे. यासंदर्भात शासनाकडून आदेश येताच त्या १० हजार ९२ उमेदवारांना पैसे परत करण्यात येतील, असे जिल्हा परिषदेतून सांगण्यात आले.
कंत्राटी ग्रामसेवक पदासाठी सर्वाधिक अर्ज...
संवर्ग - पद संख्या - अर्ज संख्या
आरोग्य पर्यवेक्षक - ०३ - ६४
आरोग्य सेवक (पु.)- २२ - २८४४
आरोग्य सेवक (हंगामी) - १०५ - ४८३७
आरोग्य परिचारिका - २४६- १२९४
औषध निर्माण अधिकारी - ०७- ५६१
कंत्राटी ग्रामसेवक - ०४ - ९४५
कनिष्ठ अभियंता (स्था.)- २४ - १७३९
कनिष्ठ अभियंता (वि.) - ०१ - ४४६
कनिष्ठ आरेखक - ०३- ४४
कनिष्ठ यांत्रिक - ०१- २७
कनिष्ठ लेखा अधिकारी - ०२- १४४
कनिष्ठ सहाय्यक - ०४- २६७
कनिष्ठ सहाय्यक लेखा - ०५- ४४२
मुख्य सेविका - १० - १९२९
पशुधन पर्यवेक्षक - २३ - ४५०
प्रयोगशाळा तंत्रज्ञ - ०१ - ५०
लघलेखक - ०१ - ९०
विस्तार अधिकारी (सां.) - ०४- ८६३
स्थापत्य अभियांत्रिकी सहा. - १० - ७०१
एकूण - ४७६ - १७७४२