पाठीवर कीडा पडल्याचे सांगून सेवानिवृत्ताचे दीड लाख पळविले, अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल
By हरी मोकाशे | Published: September 15, 2023 01:21 AM2023-09-15T01:21:26+5:302023-09-15T01:22:25+5:30
तालुक्यातील नणंद येथील सेवानिवृत्त शिक्षक नरसिंग मल्लाप्पा लादे हे सध्या लातुरात राहतात. त्यांचे पेन्शनचे खाते निलंगा येथील बँकेत आहे. खात्यावर जमा झालेली पेन्शन उचलण्यासाठी ते गुरुवारी निलंगा येथे आले होते.
लातूर : तुमच्या पाठीवर कीडा पडलेला दिसत आहे. त्यामुळे तुम्ही मान, पाठ धुवून घ्या, असे म्हणून पाणी देत एका सेवानिवृत्त शिक्षकाचे १ लाख ४२ हजार २०० रुपये अज्ञात चाेरट्याने पळविल्याची घटना गुरुवारी निलंगा शहरात घडली आहे.
तालुक्यातील नणंद येथील सेवानिवृत्त शिक्षक नरसिंग मल्लाप्पा लादे हे सध्या लातुरात राहतात. त्यांचे पेन्शनचे खाते निलंगा येथील बँकेत आहे. खात्यावर जमा झालेली पेन्शन उचलण्यासाठी ते गुरुवारी निलंगा येथे आले होते. त्यांनी बँकेतून १ लाख ४० हजार रुपये काढले आणि ते बॅगेमध्ये ठेवले. त्यानंतर ते पासबुकावरील नोंदी अद्ययावत करण्यासाठी गेले. तेव्हा त्यांच्या मान, पाठीवर खाज सुटली. त्यामुळे ते मान व पाठ खाजवित असताना अज्ञाताने त्यांच्याजवळ येऊन काय झाले आहे, पाठ का खाजविता असे म्हणत तुमच्या पाठीवर कीडा पडल्याचे दिसत असल्याचे सांगितले.
तुम्हाला पाणी आणून देतो. तुम्ही मान व पाठ धुवून घ्या असे म्हणत पाण्याची बाटली दिली. तेव्हा लादे हे मान व पाठ धूत असताना त्याने खाली ठेवलेली पैशांची बॅग पळविली. त्यात रोख १ लाख ४२ हजार २०० रुपये तसेच एक हजार रुपयांचा मोबाईल पळविला. याप्रकरणी निलंगा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोउपनि. राठोड हे करीत आहेत.