जिल्हा परिषद शाळेच्या १५ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा; उदगीर तालुक्यातील तोंडार शाळेतील घटना
By आशपाक पठाण | Published: September 12, 2023 06:23 PM2023-09-12T18:23:40+5:302023-09-12T18:23:52+5:30
उदगीर तालुक्यातील तोंडार जिल्हा परिषद शाळेत खिचडी खाल्ल्याने जवळपास १५ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली.
उदगीर (लातूर) : तालुक्यातील तोंडार जिल्हा परिषद शाळेत खिचडी खाल्ल्याने जवळपास १५ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. खिचडी खाल्ल्यावर काही वेळात विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ, पोटदुखीचा त्रास सुरू झाला. ही बाब शिक्षकांच्या लक्षात येताच तत्काळ त्या विद्यार्थ्यांना उदगीर येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
खिचडी खाल्ल्यावर त्रास झालेल्या १५ पैकी ११ जणांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. तर ४ जण दक्षता विभागात उपचार घेत असल्याचे सामान्य रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय महिंद्रकर यांनी सांगितले. तोंडारच्या शाळेत मंगळवारी मध्यान्ह भोजनात तांदूळ व हरभरा याचा वापर करून बनविण्यात आलेली खिचडी विद्यार्थ्यांना देण्यात आली. यावेळी काही जणांनी खिचडी शाळेत खाल्ली तर काहीजण घरी घेऊन गेले. खिचडी खाल्ल्यानंतर काही वेळाने विद्यार्थ्यांना मळमळी व उलटीचा त्रास सुरू झाला. दरम्यान, उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या काही पालकांनी खिचडीमध्ये आळ्या असल्याच्या व तांदळाला जाळ्या आणि हरभरे हे किडके वापरल्याचा आरोप केला आहे. निकृष्ट धान्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप पालकांनी केला आहे.
पोटदुखीमुळे विद्यार्थी त्रस्त...
रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलेल्या काही विद्यार्थ्यांना पोटदुखीचा त्रास सुरू होता, त्यामुळे ते विद्यार्थी रडत होते. यावेळी शाळेतील शिक्षिकाही रूग्णालयात उपस्थित होत्या. शाळेच्या कामानिमित्त उदगीरला गेलेले प्रभारी मुख्याध्यापक आर.बी. फड घटनेची माहिती मिळताच शाळेत हजर झाले.
सर्वांची प्रकृती स्थिर : डॉ. महिंद्रकर
रूग्णालयाच्या दक्षता विभागात अनिकेत जाधव (वय ६), सृष्टी मालोदे (वय ६), रंगनाथ कबाडे (वय १०) आरती गायकवाड (वय ८) यांच्यावर उपचार सुरू आहे. तसेच रिया गायकवाड (८), पृथ्वीराज चव्हाण (१२), अभिषेक तेलंगे (६), जुनेद शेख (११ ), यश जाधव (१०), नागनाथ गायकवाड (१०), गुरु दाजी (७ ) अनुजा स्वामी (९), अंजली राठोड (९) विजय राठोड ( ७) विजया राठोड (६) यांच्यावर उपचार करण्यात आले असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे, कुणालाही कोणताही धोका नाही असे सामान्य रुग्णालयाचे अधिष्ठता डॉ.अजय महिंद्रकर यांनी सांगितले.