लातूर जिल्ह्यातील १५ हजार बालकांचे पहिलीच्या वर्गात पडणार पाऊल

By हरी मोकाशे | Published: June 1, 2024 06:48 PM2024-06-01T18:48:09+5:302024-06-01T18:48:46+5:30

सहा वर्षे पूर्ण झालेल्या मुलांचे गावस्तरावर सर्वेक्षण

15 thousand children of Latur district will enter the first class | लातूर जिल्ह्यातील १५ हजार बालकांचे पहिलीच्या वर्गात पडणार पाऊल

लातूर जिल्ह्यातील १५ हजार बालकांचे पहिलीच्या वर्गात पडणार पाऊल

लातूर : शहरातील बालकांचा अडीच वर्षे पूर्ण झाली की इंग्रजी शाळेत प्रवेश होऊन शिक्षणाचा श्रीगणेशा सुरू होतो. ग्रामीण भागातही अंगणवाड्यांमुळे बडबड गीतांच्या माध्यमातून अध्ययन सुरू होते. मात्र, आपल्या लेकराचं पाऊल शाळेत कधी पडतं, याची उत्सुकता वाडी-ताड्यांवरील कुटुंबियांना असते. यंदा जिल्ह्यातील १५ हजार ४१५ बालकांचे पाऊल पहिलीच्या वर्गात पडणार आहे.

उन्हाळी परीक्षा संपल्यानंतर शिक्षक उत्तरपत्रिका तपासणीबरोबर समग्र शिक्षा अभियानांतर्गत गावातील किती बालकांनी वयाची ६ वर्षे पूर्ण केली आहेत, याच्या सर्वेक्षणाला सुरूवात करतात. जिल्हा परिषदेंतर्गतच्या शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी जिल्ह्यात इयत्ता पहिलीच्या वर्गासाठी प्रवेशपात्र असलेल्या मुलांचे गावस्तरावर सर्वेक्षण पूर्ण केले आहे. तसेच प्रवेश प्रक्रिया करून घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तक, गणवेश देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जिल्हास्तरावरून तालुकास्तरावर पाठ्यपुस्तकांचे वितरण झाले आहे.

१५४१५ विद्यार्थ्यांचा होणार पहिलीत प्रवेश...
तालुका - प्रवेशपात्र विद्यार्थी

लातूर - २३४७
औसा - २४५४
निलंगा - २२८३
शिरुर अनं.- ६५३
रेणापूर - १०२३
उदगीर - १५०६
जळकोट - ८१९
देवणी - ९५३
अहमदपूर - १७५९
चाकूर - १६१८
एकूण - १५४१५

साडेचार हजार जणांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण...
जिल्ह्यात एकूण १५ हजार ४१५ विद्यार्थी पहिलीच्या वर्गासाठी प्रवेशपात्र असले तरी आतापर्यंत ४ हजार ६१४ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यात औसा तालुक्यात १ हजार ५१६, निलंगा - १ हजार ८१, रेणापूर - ९१८ आणि उदगीर तालुक्यातील १ हजार ९९ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अद्याप १० हजार ८०१ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया शिल्लक आहे.

गतवर्षी १९ हजार विद्यार्थ्यांचे झाले प्रवेश...
गेल्यावर्षी जिल्ह्यात १९ हजार ३९ विद्यार्थ्यांचे पहिलीच्या वर्गात प्रवेश झाले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा विद्यार्थी संख्या कमी आहे. विशेषत: यंदा सर्वाधिक प्रवेश घेणाऱ्या मुलांची संख्या औसा तालुक्यात आहे. सर्वांत कमी संख्या शिरूर अनंतपाळात आहे.

प्रवेशपात्र विद्यार्थी...
मुले - ७७९१
मुली - ७६२४
एकूण - १५४१५

जिल्हा परिषदेच्या १२७५ शाळा...
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण १२७५ शाळा आहेत. तसेच खासगी अनुदानित प्राथमिक शाळा ३५६ आहेत. दरम्यान, पटसंख्या वाढीसाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडून गावोगावी उपक्रम राबविण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

जिल्हा परिषद शाळांच्या पटवाढीसाठी उपक्रम...
जिल्हा परिषद शाळांच्या पटवाढीसाठी प्रत्येक गावात प्रवेश पंधरवडा राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत गावातून प्रभातफेरी काढून जागृती केली जाणार आहे. त्याचबरोबर शैक्षणिक दिंडी काढून जिल्हा परिषद शाळांचे महत्त्व पटवून देण्यात येणार आहे. दरम्यान, काही शाळांनी अशा प्रकारचा उपक्रम राबविण्यास सुरूवातही केली आहे.
- प्रमोद पवार, उपशिक्षणाधिकारी

Web Title: 15 thousand children of Latur district will enter the first class

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.