लातूर जिल्ह्यात दीड हजार हेक्टरवरील पिके मातीमोल; फळबागांना सर्वाधिक फटका

By संदीप शिंदे | Published: May 5, 2023 08:28 PM2023-05-05T20:28:42+5:302023-05-05T20:28:42+5:30

प्रशासनाकडून आतापर्यंत ८७७ हेक्टरवरील पिकांचे पंचनामे करण्यात आले आहेत.

1500 hectares of crops in Latur district; Orchards are the most affected | लातूर जिल्ह्यात दीड हजार हेक्टरवरील पिके मातीमोल; फळबागांना सर्वाधिक फटका

लातूर जिल्ह्यात दीड हजार हेक्टरवरील पिके मातीमोल; फळबागांना सर्वाधिक फटका

googlenewsNext

लातूर : शेतकऱ्यांच्या पाठीमागील संकटाची मालिका पाठलाग सोडायला तयार नसल्याची स्थिती आहे. खरीप हंगामात अतिवृष्टी व रोगराईने सोयाबीनसह पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामात चांगले उत्पादन हाती लागेल, अशी आशा होती. मात्र, मार्च महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने मोठ्या प्रमाणात नुकसान केले. त्याची मदत मिळते ना मिळते तोच एप्रिल महिन्यातही अवकाळीने दीड हजार हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहेत.

खरीप हंगामात अतिवृष्टी, गोगलगाय, यलोमोझॅकने सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले गेले. खरिपातील अन्य पिकांतूनही म्हणावे तसे उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडले नाही. गेल्या पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने प्रकल्प, तलाव ओसंडून वाहिले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील पिकांना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध झाले. रब्बी हंगामातील पिकांतून चांगले उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडेल, अशी आशा होती. पिकेही जोरदार आली. मात्र, गहू, ज्वारी, हरभरा काढणीच्या वेळी अवकाळी पाऊस व गारपिटीचे संकट कोसळले. मार्च महिन्यात झालेल्या अवकाळीने गहू, ज्वारी, हरभरा, करडई, टरबूज, खरबूज, पपई, द्राक्ष, आंबे यासह भाजीपाल्यांचे नुकसान झाले. राज्य शासनाकडून नुकसानभरपाईपोटी १० कोटी रुपये मिळाले. ही रक्कम शेतकऱ्यांच्या हातात पडते ना पडते तोच एप्रिल महिन्यातही अवकाळीने हजेरी लावली. यात जिल्ह्यातील ३ हजार ४५ शेतकऱ्यांच्या शेतातील १ हजार ४७० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल आहे. दरम्यान, प्रशासनाकडून आतापर्यंत ८७७ हेक्टरवरील पिकांचे पंचनामे करण्यात आले आहेत.

अवकाळीमुळे १९६ गावांत नुकसान...
जिल्ह्यात १ ते ३० एप्रिलदरम्यान अवकाळी पाऊस व गारपिटीने १९६ गावांतील ३ हजार ४५ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यात जिरायती क्षेत्रावरील २९९ हेक्टर, बागायती ४२२ हेक्टर तर ७४८ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले आहे. यात लातूर वगळता औसा, रेणापूर, निलंगा, शिरूर अनंतपाळ, देवणी, उदगीर, जळकोट, अहमदपूर व चाकूर तालुक्यातील गावांत नुकसान झाले आहे.

८७७ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण...
जिल्हा प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे गतीने करण्यात येत असून, आतापर्यंत १ हजार ९५२ बाधित शेतकऱ्यांच्या ८७७ हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. यात जिरायती २३७ हेक्टर, बागायती २७० तर फळपिकांवरील ३६९ हेक्टरवरील पंचनामे झाले आहेत. प्रशासनाकडून पंचनामे पूर्ण झाल्यावर एकूण मदतीची मागणी शासनाकडे करण्यात येणार आहे. मार्चमधील नुकसानीचे पंचनामे करून तातडीने दहा कोटींची मदत मिळाली होती. त्याचप्रमाणे आताही पंचनामे पूर्ण करून तातडीने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

तहसीलनिहाय बाधित क्षेत्र...
तालुका             बाधित संख्या             बाधित क्षेत्र

औसा             ५६                         ४९ (हेक्टर)
रेणापूर             १८७             ९७
निलंगा             ७७०             २३५
शि.अनंत             ४७८             २८३
देवणी             १७४                        ५६
उदगीर             २९८             १४९
जळकोट             ६८४             २९४
अहमदपूर             ३३१             २४५
चाकूर             ७७             ६०
एकूण             ३०४५             १४७०

Web Title: 1500 hectares of crops in Latur district; Orchards are the most affected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.