दुकानावर कारवाई न करण्यासाठी १५ हजारांची लाच; जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षकास अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 07:07 PM2022-07-21T19:07:33+5:302022-07-21T19:08:14+5:30
सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास लाचलुचत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारदाराच्या दुकानात सापळा रचून ही कारवाई केली.
- राजकुमार जोंधळे
लातूर : जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने १५ हजारांची लाच स्विकारताना रंगेहाथ पकडले.
गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास लाचलुचत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारदाराच्या दुकानात सापळा रचून ही कारवाई केली.कृषि खते, औषधी विक्री दुकानात वेगवेगळ्या कंपनीच्या खताचे टॉनिक प्रोडक्ट विक्री करुन देण्यासाठी व तक्रारदाराच्या दुकानावर कारवाई न करण्यासाठी २५ हजारांची लाच जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी कार्यालयातील विलास किशन मिस्कीन यांनी मागितली होती. तजजोडीअंती १५ हजार रुपये देण्याचे ठरले.
दरम्यान, तक्रारदाराने केलेल्या तक्रारीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी सापळा रचला. तक्रारदाराच्या दुकानात १५ हजार रुपयांची लाच स्विकारताना पंचासमक्ष रंगेहाथ पकडले. अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक भास्कर पुल्ली यांनी सांगितले. त्यानुसार गुन्हाही नोंद करण्यात आला आहे.