मांजरा प्रकल्पावरील १८ पाणीपुरवठा योजनांसाठी महिन्याला लागते दोन दलघमी पाणी
By हणमंत गायकवाड | Published: June 8, 2023 06:06 PM2023-06-08T18:06:14+5:302023-06-08T18:06:33+5:30
मान्सून रखडल्याने पाण्याचा वापर काटकसरीने करण्याची गरज
लातूर :लातूर शहरासह मांजरा प्रकल्पावर एकूण १८ पाणीपुरवठा योजना आहेत. त्यात अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब, शिराढोण, मुरुड, येडेश्वरी शुगर, गंगा शुगर, नायगाव, आवाड शिरपुरा, धनेगाव, करजगाव, कोथळा, युसुफवडगाव आणि केज-धारूर बारा गावे पाणीपुरवठा योजना आदी गावांचा समावेश आहे. या सर्व गावांसाठी एकूण दोन दलघमी पाणी महिन्याला लागते. सद्यस्थितीत मान्सूनचा विचार करता, उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्याची गरज आहे.
मांजरा प्रकल्पामध्ये सद्यस्थितीत २४ % म्हणजे ४२ दलघमी जिवंत पाणीसाठा आहे. मृत पाणीसाठा ४७ % असून, वर्षभराच्या लागणाऱ्या पाण्याचे नियोजन केले असता, २५ दलघमी लागणार आहे. धरणात ४२ दलघमी पाणीसाठा जिवंत आहे. पुढल्या पावसाळ्यापर्यंत पिण्यासाठी पाणी पुरवू शकते. परंतु पावसाळा लांबणार असल्याच्या बातम्या येत आहेत. मान्सून रखडला असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हा विचार करता पाण्याचे नियोजन धरण प्रशासनाकडून करण्यात आले असून, काटकसरीने वापरण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. सध्या शेतीसाठी पाणी सोडण्यात आले होते. आतापर्यंत उन्हाळ्यात तीन रोटेशन झाले आहेत. रोटेशनचे टप्पे पूर्ण झाले आहेत. त्यामुळे आता पिण्यासाठीच उपलब्ध पाणी साठ्याचा वापर होणार आहे.
कोणत्या योजनेला किती लागते महिन्याला पाणी....!
लातूर शहराला १.५ दलघमी, अंबाजोगाई ०.३ दलघमी, लातूर एमआयडीसी ३५ दलघमी, केज ०.०५ दलघमी, कळंब १० दलघमी असा एकूण १८ पाणीपुरवठा योजनांसाठी महिन्याला दोन दलघमी पाण्याचा वापर पिण्यासाठी होतो.
महिन्याला ७० लाखांची पाणीपट्टी...
मांजरा प्रकल्पातून लातूर शहरासह एकूण १८ पाणीपुरवठा योजना आहेत. त्यासाठी महिन्याला ६० ते ७० लाखांची पाणीपट्टी आकारली जाते. परंतु वसुलीसंबंधित एजन्सीकडून नगण्य आहे. वसुलीला प्रतिसाद नाही. एकट्या लातूर महानगरपालिकेकडे थकबाकी २४ कोटींची आहे. अंबाजोगाई शहराकडे चार आणि लातूर एमआयडीसीकडे चालू थकबाकी सहा कोटींची असल्याचे शाखा अभियंता सूरज निकम यांनी सांगितले.
पाणीपट्टी वसुलीला अत्यल्प प्रतिसाद...।
पाणीपट्टी वसुलीची मोहीम कडक राबविली जात नसल्यामुळे संबंधित संस्थांकडे मोठ्या प्रमाणात पाणीपट्टीची थकबाकी आहे. मोठ्या गावाकडे लाखोंची थकबाकी आहे. त्यांनी पाणीपट्टी वसुलीला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.
अभूतपूर्व पाणी टंचाई लक्षात ठेवा...
गतवर्षी मृग नक्षत्रात पाऊस पडला होता. एक जूनपासूनच धरणामध्ये नव्याने पाणीसाठा सुरू झाला होता. जुलै महिन्यापासून सर्वाधिक पाणीसाठा होत गेला. यंदा मात्र मान्सून पुढे जाईल, असे संकेत आहेत. त्यामुळे चिंतेचे ढग आहेत. प्राप्त पाणी जपून वापरण्याची गरज आहे. २०१६ सालात लातूर शहरात अभूतपूर्व पाणी टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.