लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातील १८० निवासी डॉक्टर संपावर
By हरी मोकाशे | Published: January 2, 2023 06:00 PM2023-01-02T18:00:26+5:302023-01-02T18:00:51+5:30
महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर्स संघटना (मार्ड) च्या वतीने सोमवारपासून राज्यव्यापी बेदमुत संप पुकारण्यात आला आहे.
लातूर : राज्यातील शासकीय महाविद्यालयातील अपुऱ्या व मोडकळीस आलेल्या वसतीगृहामुळे विद्यार्थ्यांची होणारी हेळसांड थांबवावी, वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या १४३२ जागांच्या पदनिर्मितीचा प्रस्ताव निकाली काढावा, यासह अन्य मागण्यांसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी सोमवारपासून संप पुकारला आहे. यात येथील १८० निवासी डॉक्टर सहभागी झाले आहेत.
महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर्स संघटना (मार्ड) च्या वतीने सोमवारपासून राज्यव्यापी बेदमुत संप पुकारण्यात आला आहे. सहयोगी व सहाय्यक प्राध्यापकांची पदे तातडीने भरावीत. त्यामुळे निवासी डाॅक्टरांचे व पदवीपूर्व वैद्यकीय विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे. महागाई भत्ता तात्काळ अदा करण्यात यावा. राज्यतील वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करुन सर्व वरिष्ठ निवासी डॉक्टरांना समान वेतन लागू करावे, अशा मागण्यांसाठी हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे. येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हे आंदोलन मार्डचे अध्यक्ष डॉ. अनिल चव्हाण, सचिव याश्वीन डिसुजा यांच्या नेतृत्वाखाली झाले. आंदोलनात उपाध्यक्ष डॉ. स्वप्नील कदम, डॉ. सैफ शेख, डॉ. मयूर अग्रवाल, डॉ. अश्विन बावीस्कर यांच्यासह निवासी डॉक्टर सहभागी झाले होते.
अधिष्ठातांच्या दालनासमोर निदर्शने...
निवासी डॉक्टरांनी सकाळी ९ ते दुपारी १ वा. पर्यंत वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांच्या कार्यालयासमोर निदर्शने केली. आमच्या मागण्या तात्काळ मान्य करा अन्यथा आंदोलन आणखीन तीव्र करु अशा घोषणा देण्यात आल्या. निवासी डॉक्टरांनी दिवसभर बाह्यरुग्ण विभागात आरोग्य सेवा न दिल्याने रुग्णसेवेर परिणाम झाल्याचे दिसून आले.