लातूरच्या मातोळ्यात आढळले १९६७ वर्षापूर्वीचे दस्ताऐवज; विविध जाती- धर्माच्याही नोंदी!
By हरी मोकाशे | Published: January 18, 2024 05:42 PM2024-01-18T17:42:08+5:302024-01-18T17:43:26+5:30
लातूर जिल्ह्यात सन १९६७ पूर्वी २१ प्राथमिक आरोग्य केंद्र, युनानी/ आयुर्वेदिक दवाखान्याने होते.
लातूर : छत्रपती संभाजीनगर येथे सन १९६७ पूर्वीच्या देवीची लस घेतलेल्या नागरिकांच्या रजिस्टरमध्ये कुणबी नोंदी आढळून आल्या. त्यामुळे लातूर जिल्ह्यात अशा नोंदी मिळण्याची शक्यता असल्याने जिल्हा परिषदेअंतर्गतच्या सरकारी आरोग्य संस्थांतील नोंदी तपासण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार ५६ वर्षांपूर्वीच्या या आरोग्य संस्थांतील अभिलेख्यांची पडताळणीस सुरुवात झाली आहे. दरम्यान, मातोळा (ता. औसा) येथील दस्ताऐवजात विविध जाती- धर्माच्या नोंदी आढळल्या आहेत.
मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा- कुणबी, कुणबी- मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत आवश्यक व अनिवार्य निजामकालिन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, निजामकालिन करार, संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तऐवज आदी पुराव्यांची तपासणी करण्यात येत आहेत. गत आठवड्यात विभागीय आयुक्त तसेच न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) याचा दौरा झाला होता. तेव्हा त्यांनी १९६७ पूर्वीच्या सरकारी आराेग्य संस्थांतील नोंदींची पडताळणी करण्याचे निर्देश दिले.
१९६७ पूर्वीच्या २१ आरोग्य संस्था...
जिल्ह्यात सन १९६७ पूर्वी २१ प्राथमिक आरोग्य केंद्र, युनानी/ आयुर्वेदिक दवाखान्याने होते. त्यात मुरुड, देवणी, विळेगाव, चाकूर, उजनी, देवताळा, बेलकुंड, किल्लारी, कासारशिरसी, औराद शहाजानी, पानचिंचोली, किनगाव, शिरुर ताजबंद, पानगाव, रेणापूर, दर्जी बोरगाव, जळकोट, अतनूर, शिरुर अनंतपाळ, येरोळ, हंडरगुळी.
अभिलेखे विनाविलंब शोधण्याच्या सूचना...
सन १९६७ पूर्वीच्या सरकारी आरोग्य संस्थांतील तत्कालिन रजिस्टर, अभिलेख्यांचा शोध घ्यावा. त्यातील देवीच्या लस नोंदी, गरोदर माता नोंदणी, प्रसूतीच्या नोंदी, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया नोंदी व इरत काही नोंदी असतील तर त्यांची तपासणी करावी. त्यात कुणबी, कुणबी- मराठा, मराठा- कुणबी अशी नोंद असल्यास त्याची पडताळणी करुन तपासणी अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हा परिषदेचे सीईओ अनमोल सागर यांनी केल्या आहेत. त्यासाठी तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली सात जणांचे पथक नियुक्त करण्यात आले आहे.
सात आरोग्य संस्थांतील दस्ताऐवजांची तपासणी...
दोन दिवसांत दर्जी बोरगाव, अतनूर, देवताळा, पानगाव, हंडरगुळी, उजनी येथील आरोग्य संस्थांतील दस्ताऐवजांची पडताळणी करण्यात आली. परंतु, सन १९६७ पूर्वीचे अभिलेखे आढळून आले नाहीत. औसा तालुक्यातील मातोळा येथील तत्कालिन आयुर्वेदिक दवाखान्याचे आता देवताळा येथे आरोग्य केंद्रात रुपांतर झाले आहे. त्या ठिकाणी १९६७ पूर्वीच्या प्रसूती, बाह्यरुग्ण विभागाच्या रुग्णांच्या नोंदी, कॉलरा लसीच्या नोंदी आढळल्या. या नोंदीपुढे मराठा, वाणी, कैकाडी, धनगर, मराठी, मुस्लिम अशा विविध जाती- धर्माच्या नोंदी आढळल्या.
नोंदी आढळल्यास तात्काळ माहिती द्यावी...
सन १९६७ पूर्वीची प्रसूती नोंदणी, कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया, कॉलरा, देवीच्या लसीच्या नोंदी नागरिकांकडे असू शकतात. त्यावर जातीचा उल्लेख असू शकतो. तशा नोंदी आढळल्यास तालुका आरोग्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
- डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी.