२ लाख शेतकऱ्यांनी विम्यापोटी १ दिवसात भरले २८ लाख
By Admin | Published: July 2, 2014 11:43 PM2014-07-02T23:43:20+5:302014-07-03T00:17:30+5:30
किल्लारी : अद्यापही पाऊस झाला नसल्याने शेतकरी धास्तावला आहे़ त्यामुळे पीक विमा भरण्यासाठी बँकेत शेतकऱ्यांनी गर्दी केली होती़
किल्लारी : अद्यापही पाऊस झाला नसल्याने शेतकरी धास्तावला आहे़ त्यामुळे पीक विमा भरण्यासाठी बँकेत शेतकऱ्यांनी गर्दी केली होती़ सोमवारी अवघ्या एक दिवसात २ लाख ६ हजार शेतकऱ्यांनी २८ लाख ४७ हजार रूपयाचा विमा एका खाजगी कंपनीकडे भरला आहे़
लातूर जिल्हा मध्यवर्ती सह़बँक, किल्लारी शाखेत किल्लारीसह परीसरातील किल्लारीवाडी, वळवट, सिरसळ, कार्ला, कुनठातळ, वाणेवाडी, पारधेवाडी (तळणी इत्यादी गावातील) २ लाख ६ हजार शेतकऱ्यांनी एकाच दिवशी २८ लाख ४७ हजार विमा भरला आहे़ शेतकऱ्याची गैरसोय होऊ नये म्हणून रात्री उशीरापर्यंत बँक चालू होवून विमा भरून घेतला त्यामुळे शेतकरी आनंदीत होवून त्यांचे अभिनंदन केले़ ३० जून २०१४ शेवट दिवस असल्यामुळे गर्दी होती़
राष्ट्रीय पिकविमा कार्यक्रम अंतर्गत एका खाजगी कंपनीमार्फत हवामान आधारीत पिकविमा भरून घेतला जात होता़ मुदत संपल्याने काही शेतकऱ्यांना या विम्याचा लाभ घेता आला नाही़ (वार्ताहर)
शेतकरी अचंबित़़
पाऊस नाही, परंतु, विमा कसा भरून घेतला जात आहे, अशी चर्चा शेतकऱ्यांतून होत होती़ पीकपेरणीच नाही तर विमा कसा मिळणार असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभे होते़ तेव्हा तलाठी व्ही़आरक़ांबळे म्हणाले, पावसाचा सबंध नाही, पेरणीचा सबंध नाही, हे हवामान अधारीत विमा आहे़ त्यामुळे विमा भरा़ ज्यांना हे कळले त्यांनी भरले़ बाकीचे तसेच राहिले आहेत़ विमा भरण्यासाठी मुदत वाढवून देण्यात यावी अशी मागणी उर्वरित शेतकरी करीत आहेत़ अनेक शेतकऱ्यांना हवामान अधारित पीकविम्याची योग्य माहिती मिळली नसल्याने शेतकऱ्यांची अडचण झाली आहे़ त्यामुळे मुदत वाढीची मागणी होत आहे़