माेबाइल हिसकावत पळ काढणाऱ्या २ चाेरट्यांच्या मुसक्या आवळल्या
By राजकुमार जोंधळे | Published: September 26, 2023 02:15 PM2023-09-26T14:15:24+5:302023-09-26T14:15:39+5:30
दुचाकीसह २३ माेबाइल असा ३ लाख ४९ हजारांचा मुद्देमाल जप्त
लातूर : शहरातील विविध भागांमध्ये माेबाइल हिसकावत वाटमारी करणाऱ्या टाेळीतील दाेघांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आवळल्या आहेत. त्यांच्याकडून दुचाकीसह २३ माेबाइल असा ३ लाख ४९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मंगळवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने कोठडी सुनावली आहे.
पाेलिसांनी सांगितले, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी चाेरट्यांनी एकाला वाटेत अडवून जबरदस्तीने मोबाइल हिसकावत पळ काढल्याची घटना घडली हाेती. याचा छडा लावण्याचे आदेश जिल्हा पाेलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा, एमआयडीसी ठाण्याच्या पथकाकडून चाेरट्यांचा माग काढला. फिर्यादीने सांगितलेल्या वर्णनावरून पोलिसांच्या रेकाॅर्डवरील, लातूरलगतच्या जिल्ह्यातील अनेक गुन्हेगारांची चाचपणी केली.
दरम्यान, रविवारी खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पाेलिसांनी श्याम उर्फ लाल्या सुरेश पवार (२२, रा. वरवंटी, लातूर), ओम मोहन गायकवाड (१८, रा. हरंगुळ खुर्द, ता. लातूर) यांना ताब्यात घेत झाडाझडती घेतली. चाैकशीनंतर लातुरातील विविध ठिकाणावरून अन्य एका साथीदाराच्या मदतीने पादचाऱ्यांना वाटेत अडवून लुटल्याची कबुली दिली. चोरी केलेले २३ मोबाइल, दुचाकी असा ३ लाख ४९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटकेतील आराेपींकडून एमआयडीसी हद्दीतील चोरीच्या एका गुन्ह्याचा उलगडा झाला आहे.
ही कारवाई अपर पाेलिस अधीक्षक डाॅ. अजय देवरे, डीवायएसपी भागवत फुंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजीवन मिरकले, माधव बिलापट्टे, नवनाथ हासबे, मोहन सुरवसे, राजू मस्के, तुराब पठाण, जमीर शेख, संतोष खांडेकर यांच्या पथकाने केली.