फिट इंडियात जिल्ह्यातील २ हजार शाळा अनफिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:16 AM2020-12-25T04:16:26+5:302020-12-25T04:16:26+5:30
केंद्र शासनाचे खेलो इंडिया अंतर्गत फिट इंडिया हा उपक्रम राबविला आहे. मुलांना शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना शारीरिक सुदृढतेचे ...
केंद्र शासनाचे खेलो इंडिया अंतर्गत फिट इंडिया हा उपक्रम राबविला आहे. मुलांना शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना शारीरिक सुदृढतेचे महत्व पटवून देण्यासाठी, जागृती करण्यासाठी आणि शारीरिक क्षमता मूल्यमापन चाचण्या या शाळास्तरावर घेण्यासाठी उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा उद्देश आहे. यासाठी संकेतस्थळावर तसेच मोबाईल ॲपवर नोंदणी करणे सुरू आहे. मात्र जिल्ह्यात २ हजार ६९६ शाळांपैकी आतापर्यंत केवळ ६७८ शाळांनीच नोंदणी केली आहे. तर २०१८ शाळा या उपक्रमात नोंदणीअभावी अनफिट ठरल्या आहेत.
या उपक्रमाच्या नोंदणीसाठी २७ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. मात्र जिल्ह्यातील शाळांचा अल्प प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात जवळपास साडेपाचशेहून अधिक क्रीडा शिक्षक आहेत. मात्र त्यांच्यावर इतर विषयांची जबाबदारी असल्याने विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात क्रीडा मार्गदर्शन होत नसल्याची ओरड आहे. जिल्ह्यात केवळ २५.१५ टक्केच नोंदणी झाली आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत किती शाळा नोंदणी करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
फिट इंडिया उपक्रमासाठी नोंदणी करताना तांत्रिक अडचणी येत असल्याच्या शिक्षकांच्या तक्रारी आहेत. सोशल माध्यमातून लिंक पाठविण्यात येत आहे. मात्र लिंक ओपन होत नाही. तसेच अनेक शाळांमध्ये प्रभारींवरच क्रीडा शिक्षकाची जबाबदारी देण्यात आली असल्याचे चित्र आहे.
शासन निर्देशानुसार जिल्ह्यातील शाळांनी फिट इंडियाअंतर्गत ऑनलाईन माहिती सादर करावी, याबाबत सूचना दिल्या आहेत. नोंदणी व्हावी, शिक्षक, विद्यार्थ्यांची माहिती शासकीय वेबसाईटवर अपलोड व्हावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने पाठपुरावा केला जात असल्याचे सांगण्यात आले. तसेच शाळांना पत्रव्यवहार झाला.
मिळालेल्या मार्गदर्शक सूचनेनुसार शाळांना फिट इंडिया मोहिमेत सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. पुढील दोन दिवसांत जास्तीत जास्त शाळांची नोंदणी करण्यासाठी सूचना करण्यात आल्या आहेत. त्यानुसार शाळांचा प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
- महादेव कसगावडे,
जिल्हा क्रीडाधिकारी