२०८ उमेदवारांचे भविष्य सीलबंद! लातूर जिल्ह्यातील चार नगर पंचायतींसाठी शांततेत मतदान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2021 07:36 PM2021-12-21T19:36:20+5:302021-12-21T19:37:12+5:30
येथे एकूण ७६.८५ टक्के मतदान झाले असून, आता निकालाची उत्सुकता लागली आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणामुळे १६ जागांवर निवडणूक झाली नाही. या जागांवर १८ जानेवारीला निवडणूक होणार असल्याने सर्वच मतमोजणी १९ जानेवारीला होणार असल्याचे निवडणूक विभागातून सांगण्यात आले.
लातूर- जिल्ह्यातील चाकूर, जळकोट, देवणी आणि शिरूर अनंतपाळ या चार नगरपंचायतींच्या ५२ जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक झाली. या निवडणुकीसाठी २०८ उमेदवार रिंगणात होते. त्यासाठी ६२ मतदान केंद्रांवर मंगळवारी शांततेत मतदान झाले. एकूण २५ हजार २१३ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यात १३ हजार ३२४ पुरुष मतदार तर ११ हजार ८८९ महिला मतदारांचा समावेश आहे.
येथे एकूण ७६.८५ टक्के मतदान झाले असून, आता निकालाची उत्सुकता लागली आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणामुळे १६ जागांवर निवडणूक झाली नाही. या जागांवर १८ जानेवारीला निवडणूक होणार असल्याने सर्वच मतमोजणी १९ जानेवारीला होणार असल्याचे निवडणूक विभागातून सांगण्यात आले.
जळकोट नगरपंचायतीसाठी ८१.९१ टक्के मतदान -
जळकोट नगरपंचायतीच्या एकूण १३ जागांसाठी ५२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यासाठी १३ केंद्रांवर मंगळवारी मतदान झाले. ६ हजार १०८ मतदारांपैकी ५ हजार ०३ मतदारांनी या निवडणुकीत आपल्या मतदानाचा हक्क बजावला. त्यात २ हजार ६६१ पुरुष तर २ हजार ३४२ स्त्री मतदारांचा समावेश आहे. पुरुष मतदारांच्या मतदानाची टक्केवारी ८३.०५ तर महिला मतदारांच्या मतदानाची ८०.६५ टक्के आहे.
चाकूर नगरपंचायतीत ९१९९ मतदारांनी बजावला हक्क -
चाकूर नगरपंचायतीच्या एकूण १३ जागांसाठी ५८ उमेदवार रिंगणात होते. २३ मतदान केंद्रांवर ९१९९ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यात ४८९४ पुरुष मतदार तर ४३०५ महिला मतदारांचा समावेश आहे. ७४.८४ टक्के पुरुष मतदारांनी तर ७४.६७ टक्के महिला मतदारांनी मतदान केले. एकूण ७४.७६ टक्के मतदान चाकूर नगरपंचायतीसाठी झाले.
देवणीत ६६ मतदान केंद्रांवर मतदान -
देवणी नगरपंचायतीत एकूण १३ जागांसाठी सार्वत्रिक निवडणूक झाली असून, १३ जागांसाठी १३ मतदान केंद्रांवर ६६ उमेदवारांसाठी मतदान झाले. ८४९६ मतदारांपैकी ६०७४ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यात ३२०७ पुरुष तर २८६७ महिला मतदारांचा समावेश आहे. या नगरपंचायतीत एकूण ७१.४९ टक्के मतदान झाले. सकाळी ७.३० वाजेपासून सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत शांततेत मतदान झाले.
शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीसाठी ३२ उमेदवार -
शिरूर अनंतपाळ नगरपंचायतींच्या १३ जागांसाठी ३२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. १३ केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया मंगळवारी शांततेत झाली. ६१९९ मतदारांपैकी ४९३७ मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यात २५६२ पुरुष तर २३७५ महिला मतदारांचा समावेश होता. एकूण ७९.६४ टक्के मतदान या नगरपंचायतीसाठी झाले.