लातूरच्या २१ सरकारी दवाखान्यांचा राज्यस्तरीय आरोग्य सन्मानने गौरव
By हरी मोकाशे | Updated: April 7, 2025 19:18 IST2025-04-07T19:16:59+5:302025-04-07T19:18:11+5:30
राज्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील सर्वाधिक मानांकन लातूर जिल्ह्यास मिळाले आहेत.

लातूरच्या २१ सरकारी दवाखान्यांचा राज्यस्तरीय आरोग्य सन्मानने गौरव
लातूर : जिल्ह्यातील ११ प्राथमिक आरोग्य केंद्र, ८ उपकेंद्र आणि मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयास राष्ट्रीय मानांकन मिळाल्याबद्दल तर अहमदपूर ग्रामीण रुग्णालयात सर्वाधिक शस्त्रक्रिया झाल्याबद्दल राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर, आरोग्य राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते सोमवारी मुंबईत राज्यस्तरीय आरोग्य सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.
याप्रसंगी सचिव निपुन विनायक, वीरेंद्र सिंग, संचालक डॉ. अंबाडेकर, राष्ट्रीय आरोग्य अभियानचे आयुक्त रंगा नायक यांची प्रमुख उपस्थिती होती. हा पुरस्कार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजाभाऊ गलांडे, अहमदपूर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. बाळासाहेब नागरगोजे, डाॅ. सगीरा पठाण, डॉ. पल्लवी रेड्डी, डॉ. राठोड यांनी स्वीकारला.
एनक्यूएएस कार्यक्रमांतर्गत २०२४-२५ मध्ये जिल्ह्यातील एकूण २० आरोग्य संस्थांना राष्ट्रीय मानांकन मिळाले आहे. त्यात मुरुडचे ग्रामीण रुग्णालय, कासार बालकुंदा, हडोळती, हंडरगुळी, शिरूर ताजबंद, वांजरवाडा, लामजना, जवळगा पो., भातांगळी, हेर, हलगरा, जवळा बु. येथील प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच पाखरसांगवी, सारोळा, काजळ हिप्परगा, किणी यल्लादेवी, अवलकोंडा, तोंडार, तोंडचीर व घोणसी येथील आरोग्य उपकेंद्रांचा समावेश आहे. तसेच अहमदपूर ग्रामीण रुग्णालयात सर्वाधिक शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत.
राज्यात सर्वाधिक पुरस्कार लातूरला...
राज्यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील सर्वाधिक मानांकन लातूर जिल्ह्यास मिळाले आहेत. त्याबद्दल राज्य शासनाच्या वतीने सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर- घुगे, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांनी कौतुक केले.