जिल्ह्यात २१ हजार ४९८ विद्यार्थ्यांनी दिली नीट परीक्षा, प्रथमच बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी
By संदीप शिंदे | Published: July 17, 2022 06:01 PM2022-07-17T18:01:02+5:302022-07-17T18:01:15+5:30
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा जिल्ह्यातील ४२ केंद्रावर रविवारी पार पडली.
लातूर : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी नीट परीक्षा जिल्ह्यातील ४२ केंद्रावर रविवारी पार पडली. परीक्षेसाठी २१ हजार ९२६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी २१ हजार ४९८ विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. तर ४२८ विद्यार्थी अनुपस्थित होते. यंदा प्रथमच प्रत्येक परीक्षा हॉलमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि बायोमेट्रिक हजेरीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी नीट परीक्षा महत्वाची समजली जाते. रविवारी जिल्ह्यातील ४२ केंद्रावर दुपारी २ ते ५ या वेळेत परीक्षा सुरळीत पार पडली. नीट परीक्षेसाठी अनेक विद्यार्थी लातुरात तयारीसाठी येतात. त्यानुसार २१ हजार ९२६ विद्यार्थ्यांनी जिल्ह्यात नोंदणी केली होती. पैकी २१ हजार ४९८ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले. तर ४२८ विद्यार्थी परीक्षेला गैरहजर होते. एकूण ९८ टक्के विद्यार्थ्यांनी या परीक्षेला उपस्थिती दर्शविली.
प्रारंभी सकाळी ११ वाजेपासून विद्यार्थ्यांना केंद्रावर प्रवेश देण्यात येत होते. त्यामुळे शहरासह औसा, उदगीर आणि अहमदपूर येथील केंद्रासमोर पालकांनी मोठी गर्दी केली होती. दुपारी १.३० वाजेपर्यंतच विद्यार्थ्यांना केंद्रावर प्रवेश देण्यात आले. त्यानंतर दुपारी २ ते ५ या वेळेत परीक्षा पार पडली. यंदा प्रथमच औसा १, उदगीर २, अहमदपूर १ आणि लातूर शहरात ३८ केंद्राचे नियोजन करण्यात आले होते. दरम्यान, जिल्ह्यातील ४२ केंद्रावर शांततेत परीक्षा पार पडली असल्याचे नीट परीक्षेचे समनव्यक तथा पोद्दार इंटरनॅशनल स्कुलचे प्राचार्य गिरीधर रेड्डी, प्राचार्य सचिदानंद जोशी यांनी सांगितले.
९८ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती...
नीट परीक्षेसाठी ९८ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. तर २ टक्के विद्यार्थी अनुपस्थित होते. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यातील ४२ केंद्रावर परीक्षा सुरळीत पार पडली असल्याचे प्राचार्य गिरीधर रेड्डी यांनी सांगितले.