प्रशिक्षणास दांडी मारणाऱ्या २१० ग्रामपंचायत सदस्यांना नोटीस, खर्च वसुली होणार

By हरी मोकाशे | Published: June 8, 2023 07:57 PM2023-06-08T19:57:00+5:302023-06-08T19:57:14+5:30

मुरुडच्या पंचायत राज प्रशिक्षण केंद्राच्या वतीने लातुरातील कृषी विज्ञान केंद्रात ग्रामपंचायत सदस्यांसाठी प्रशिक्षण होत आहे.

210 gram panchayat members who skip training will be given notice, disqualification action | प्रशिक्षणास दांडी मारणाऱ्या २१० ग्रामपंचायत सदस्यांना नोटीस, खर्च वसुली होणार

प्रशिक्षणास दांडी मारणाऱ्या २१० ग्रामपंचायत सदस्यांना नोटीस, खर्च वसुली होणार

googlenewsNext

लातूर : ग्रामपंचायत सदस्यांसाठी मुरुडच्या पंचायत राज प्रशिक्षण केंद्राच्या वतीने गुरुवारपासून प्रशिक्षण होत आहे. पहिल्या दिवशी लातूर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींचे २१० सदस्य अनुपस्थित राहिल्याचे आढळून आले. त्याची जिल्हा परिषदेच्या सीईओंनी गांभीर्याने दखल घेत तत्काळ नोटिसा बजावण्याचे आदेश गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. शिवाय, प्रशिक्षणास दांडी मारणाऱ्या या ग्रामपंचायत सदस्यांकडून प्रशिक्षणावर होणारा खर्च वसूल करण्याबरोबरच अपात्रतेची कार्यवाही करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा, असेही स्पष्ट बजावले आहे.

ग्रामपंचायतीचा कारभार कसा करावा, मासिक तसेच ग्रामसभा कशी घ्यावी. त्यात गावच्या विकासात्मक बाबींवर चर्चा करुन निर्णय कसे घ्यावेत, ग्रामपंचायत सदस्यांचे अधिकार काेणते, कर्तव्ये कोणती तसेच ग्रामपंचायतीचे विकास आराखडे कसे तयार करावेत, अशा विविध बाबींची माहिती होण्यासाठी राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान अंतर्गत ८ ते १० जून या कालावधीत मुरुडच्या पंचायत राज प्रशिक्षण केंद्राच्या वतीने लातुरातील कृषी विज्ञान केंद्रात ग्रामपंचायत सदस्यांसाठी प्रशिक्षण होत आहे. दुसऱ्या टप्प्यातील या प्रशिक्षणास लातूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीचे २५० ग्रामपंचायत सदस्य उपस्थित राहणे अपेक्षित आहे. दरम्यान, गुरुवारी पहिल्याच दिवशी ११ ग्रामपंचायतींचे ४० सदस्य उपस्थित होते. उर्वरित १५ ग्रामपंचायतींचे २१० सदस्य अनुपस्थित असल्याचे आढळून आले. त्याची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे.

प्रशिक्षणाचा खर्च वसुलीची कार्यवाही...

ग्रामपंचायत सदस्यांसाठी आयोजित प्रशिक्षणास पहिल्याच दिवशी १५ ग्रामपंचायतीचे २१० सदस्य अनुपस्थित होते. त्यामुळे जिल्हा परिषदेचे सीईओ अभिनव गाेयल यांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत प्रशिक्षणावरील खर्च वाया जात असल्याचे म्हटले आहे. तसेच या सदस्यांना ग्रामपंचायत कामकाजात स्वारस्य नसल्याचे दिसून येते. गैरहजर सदस्यांना लातूरच्या बीडीओंनी तत्काळ नोटिसा बजावून सुनावणी घ्यावी. त्यानंतर संबंधित ग्रामपंचायत सदस्यांच्या अपात्रतेचा प्रस्ताव सादर करावा. शिवाय, प्रशिक्षणावर झालेल्या खर्चाच्या वसुलीबाबत नोटिसा बजावून कार्यवाही करावी, असे आदेश दिले आहेत.
- दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पंचायत.

या ग्रामपंचायतीचे सदस्य गैरहजर...

वरवंटी बु., महापूर, पाखरसांगवी, रामेश्वर, गंगापूर, गांजूर, ताडकी, अखरवाडी, पिंपरी आंबा, ढाकणी, सोनवती, चांडेश्वर, भोईसमुद्रगा, हरंगुळ खु., कोळपा येथील ग्रामपंचायत सदस्य अनुपस्थित होते.

Web Title: 210 gram panchayat members who skip training will be given notice, disqualification action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.