नीट प्रकरणातील आराेपींकडून २२ लाखांचा व्यवहार; पाच पथकांकडून समांतर तपास
By राजकुमार जोंधळे | Published: June 26, 2024 05:10 AM2024-06-26T05:10:38+5:302024-06-26T05:11:34+5:30
नीटमध्ये गुणवाढ करण्याचे आमिष दाखवून केला गेलेल्या व्यवहाराचा आकडा गेल्या दाेन दिवसांच्या चाैकशीत २२ लाखांवर आहे.
लातूर : नीटमध्ये गुणवाढ करण्याचे आमिष दाखवून केला गेलेल्या व्यवहाराचा आकडा गेल्या दाेन दिवसांच्या चाैकशीत २२ लाखांवर आहे. त्यात आणखी वाढ हाेण्याची शक्यता असल्याचे सूत्रांनी मंगळवारी सांगितले. आराेपी मुख्याध्यापक जलील पठाण आणि शिक्षक संजय जाधवने नीट गुणवाढीसंदर्भाने वेगवेगळ्या लाेकांकडून घेतलेली रक्कम २२ लाखांवर आहे. त्यात आराेपीने वेगवेगळे संदर्भ दिले असून, काहींचे पैसे परत केले आहेत व काही व्यवहार हे नातेवाईकांतील असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे काेणाकडून पैसे घेतले, पुढे काेणाला दिले अथवा दिले नाहीत. काेणा-काेणाला परत केले, त्यात नातेवाईकांचे वा व्यक्तिगत व्यवहार काेणते हाेते, याचा तपशील पाेलिस पडताळत आहेत.
इरण्णा देगलूरचा मुक्काम लातुरात...
आराेपी शिक्षक संजय जाधव, जलील पठाण आणि इरण्णा काेनगलवार याची एप्रिल महिन्यातच पहिली भेट झाल्याचे चाैकशीत समाेर आले आहे. लातुरातील नंदी स्टाॅप, औसा राेड परिसरात इरण्णा वास्तव्याला आहे. ताे मुळचा देगलूरचा असून, मुक्काम मात्र लातुरात हाेता. एप्रिलमध्ये नीट गुणवाढीसंदर्भात त्यांचे नियाेजन ठरल्याचा पाेलिसांचा अंदाज आहे. इरण्णाने सांगितल्याप्रमाणे संजय आणि जलीलने प्रवेशपत्रे व राेख रक्कम घेतली आणि इरण्णाच्या व्हाटस्अपवर पाठविल्याचे उघड झाले आहे.
पाच पथकांकडून समांतर तपास...
नीट प्रकरणाचा तपास वेगवगळ्या पाच पथकाकडून केला जात असून, यामध्ये नांदेड येथील एटीएस, स्थानिक गुन्हे शाखा, उपविभागीय पाेलिस अधिकारी यांचे आणि इतर दाेन पथकांचा समावेश आहे. त्यांच्याकडून आराेपी आणि संशयीतांची कसून चाैकशी केली जात आहे.