लातूर जिल्ह्यातील दहा बाजार समित्यांसाठी २२ हजार मतदार; ६२ केंद्रावर होणार मतदान
By संदीप शिंदे | Published: April 26, 2023 05:56 PM2023-04-26T17:56:14+5:302023-04-26T17:56:44+5:30
लातूर, औसा, उदगीर, चाकूरसाठी २८ तर उर्वरित सहा समित्यांसाठी ३० रोजी मतदान
लातूर : जिल्ह्यातील दहा बाजार समित्यांसाठी निवडणुक होत असून, उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने मतदान आणि मतमोजणीची तयारी करण्यात आली आहे. दहा बाजार समित्यांसाठी २२ हजार २४९ मतदार आपला हक्क बजावणार असून, मतदानासाठी ६२ केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. यातील चार बाजार समित्यांसाठी शुक्रवारी सकाळी ८ ते सायंकाळी ४ यावेळेत मतदान होणार असून, त्यानंतर लगेच मतमोजणी होणार आहे.
जिल्ह्यातील लातूर, देवणी, जळकोट, निलंगा, औसा, रेणापूर, औराद शहाजानी, जळकोट, चाकूर आणि अहमदपूर बाजार समित्यांसाठी निवडणुक होत आहे. यामध्ये लातूर, औसा, चाकूर आणि उदगीर बाजार समितीसाठी २८ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. तर उर्वरित सहा बाजार समित्यांसाठी ३० एप्रिल रोजी मतदान होणार आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने बाजार समित्यांसाठी निवडणुक निर्णय अधिकारी नियुक्त करण्यात आले असून, ६२ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये २२ हजार २४९ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. मतदानानंतर लगेच मतमोजणी होणार आहे.
दरम्यान, विविध राजकीय पक्षांची निवडणुकीमध्ये राजकीय प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पॅनलमधील उमेदवार विजयी व्हावेत, यासाठी सोसायटी, ग्रामपंचायत, व्यापारी, हमाल व तोलारी यांच्या बैठका घेण्यात येत आहे. बाजार समितीत सत्ता आल्यास काय करणार याबाबत जाहीरनामाही देण्यात येत आहे. मात्र, निकालानंतरच मतदार कोणाच्या बाजूने कौल देतात याचे चित्र स्पष्ट होणार आहे.
बाजार समितीनिहाय असे आहेत मतदार...
लातूर बाजार समितीमध्ये ५९८३, देवणी ९४७, अहमदपूर २१७५, औसा २७१९, चाकूर १४६९, जळकोट १०८९, रेणापूर १४१९, औराद शहाजानी १२७६, निलंगा १७३७ तर उदगीर बाजार समितीसाठी ३ हजार ४३५ मतदार आपला हक्क बजावणार आहेत. औसा, लातूर, उदगीर, चाकूर या चार बाजार समित्यांसाठी शुक्रवार, २८ एप्रिल रोजी मतदान होणार असून, देवणी, जळकोट, अहमदपूर, रेणापूर, औराद शहाजानी, निलंगा या सहा बाजार समित्यांसाठी रविवार ३० एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यानंतर लगेच मतमोजणी होणार आहे.
सहकारी संस्था मतदार संघात सर्वाधिक मतदार...
दहा बाजार समित्यांसाठी सहकारी संस्था, ग्रामपंचायत, व्यापारी आणि हमाल व तोलारी मतदारसंघ आहेत. यामध्ये सहकारी संस्था मतदारसंघात सर्वाधिक ८ हजार ८४ मतदार आहेत. त्यापाठोपाठ ग्रामपंचायत मतदारसंघात ६ हजार ८८७, व्यापारी मतदारसंघ ५ हजार २७५, हमाल व तोलारी मतदारसंघात ३ हजार ३ मतदार आहेत. या मतदारांसाठी एकाच ठिकाणी मतदार करता यावे, यासाठी ६२ मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे. यातील बहूतांश मतदारसंघ हे शाळेच्या ठिकाणी आहेत. २८ आणि ३० एप्रिल असे दोन टप्प्यात मतदान होणार असून, मतादनाच्या दिवशीच दुपारी ४ वाजेनंतर मतमोजणी होणार आहे.