पोलीस भरतीचे स्वप्न राहिले अपूरे; रस्त्यावर व्यायाम करताना कारने चिरडले; तरुणाचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 11:17 AM2022-05-15T11:17:42+5:302022-05-15T11:17:58+5:30
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणाचा कारच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अहमदपूर-अंबाजोगाई मार्गावरील दगडवाडी येथे घडली आहे.
किनगाव (लातूर) : पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या एका तरुणाचा कारच्या धडकेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अहमदपूर-अंबाजोगाई मार्गावरील दगडवाडी येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अहमदपूर तालुक्यातील दगडवाडी येथील दोन युवक नेहमीप्रमाणे पोलीस भरतीसाठी रस्त्याच्या बसून व्यायाम करत होते. यावळी अचानक भरधाव वेगातील कारची त्यांना धडक बसली. यात एकजण जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना रविवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास दगडवाडी येथे घडली आहे. दगडवाडी येथील रहिवासी असलेला मयत मुकुंद रामराव मुंढे (22) व प्रतिक पांडुरंग मुंढे (22) हे दोघे वर्गमित्र असून ते पोलीस भरतीसाठी दररोज पहाटे उठून व्यायाम करीत असत. मुकुंद मुंढे हा डी फार्मसीचे शिक्षण झाल्याने एका मेडिकल दुकानावर काम करीत होता. तर, प्रतिक मुंढे याची आसाम रायफल्समध्ये भरती झाली आहे.
रविवारी सकाळी हे दोघे रस्त्याच्या बाजूस व्यायाम करीत असताना अंबाजोगाईकडून अहमदपूरकडे जाणाऱ्या भरधाव वेगातील कार (एमएच 44, एस 7970) ने त्या दोघांना धडक दिली. यात मुकुंद मुंढे याचा जागीच मृत्यू झाला. प्रतिक मुंढे हा गंभीर जखमी झाल्याने त्याला अंबाजोगाई येथील सरकारी रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलीस खात्यात भरती होऊन गावाचे नाव उंचावण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एका तरुण पोराचा एका दुर्दैवी मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.