बियाणे न उगवल्याच्या २२० तक्रारी, पंचनामे केवळ १४३ जणांचेच
By आशपाक पठाण | Published: July 24, 2023 06:28 PM2023-07-24T18:28:44+5:302023-07-24T18:40:03+5:30
शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्यावर कृषी विभागाच्या वतीने महाबीज कंपनीचे कर्मचारी सोबत घेऊन पंचनामे केले जात आहे.
लातूर : महाबीज कंपनीचे सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारींचा ओघ अजूनही कृषी विभागाकडे सुरूच आहे. सोमवारपर्यंत २२० शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्या असून, यातील जवळपास १४३ जणांचे पंचनामे करण्यात आले आहेत. यासंदर्भात चार दिवसांत आयुक्तांना अहवाल सादर केला जाणार आहे. त्यामुळे उर्वरित पंचनामे गतीने करण्यात येत आहेत.
लातूर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पाऊस उशिरा झाल्याने पेरण्याही उशिरा झाल्या. त्यातही विश्वासाच्या बियाणाने दगा दिल्याने शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा फटका बसला आहे. औसा, निलंगा तालुक्यात सर्वाधिक शेतकऱ्यांनी महाबीजच्या बियाणाबाबत तक्रारी केल्या होत्या. तक्रार दिल्यावरही आठ आठ दिवस पंचनामे होत नसल्याने शेतकऱ्यांनी कृषी विभागाची वाट न पाहता दुबार पेरणी केली. त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी जवळपास दहा हजार रुपयांचा जास्तीचा खर्च करावा लागला आहे. शिवाय, पेरणीला उशीर झाल्याने उत्पन्न घटण्याची भीती व्यक्त होत आहे.
कृषी विभागाचे कर्मचारी बांधावर...
बियाणे उगवले नसल्याच्या तक्रारी आलेल्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन कृषी विभाग, महाबीज कंपनीचे अधिकारी, कर्मचारी पाहणी करून पंचनामे करीत आहेत. आतापर्यंत ७० टक्के पंचनामे पूर्ण झाल्याचा दावा कृषी विभागाकडून करण्यात आला आहे. चार दिवसांत उर्वरित पंचनामे पूर्ण करून याचा अहवाल वरिष्ठांना दिला जाणार आहे.
विभागीय आयुक्तांना अहवाल देणार...
शेतकऱ्यांनी तक्रारी दिल्यावर कृषी विभागाच्या वतीने महाबीज कंपनीचे कर्मचारी सोबत घेऊन पंचनामे केले जात आहे. सोमवारपर्यंत जवळपास २२० तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यातील ७० टक्के पंचमाने पूर्ण झाले आहेत. उर्वरित पंचनामे सुरू आहे. यासंदर्भातचा अहवाल विभागीय आयुक्त, अकोला येथील महाबीज कंपनीला दिला जाणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रक्षा शिंदे यांनी दिली.
नुकसानभरपाई मिळणार कधी...
महाबीजचे बियाणे न उगवण्याचे कारण पंचनाम्यातून स्पष्ट होईल. जिल्ह्यात औसा, निलंगा या दोनच तालुक्यातील सर्वाधिक तक्रारी आहेत. त्यामुळे या भागात आलेल्या बियाणांचा लॉट खराब आला का, पेरणीत काही गडबड झाली, ओलावा होता की नाही याची माहिती घेतली जात आहे. पंचनामे पूर्ण झाल्यावर अहवाल गेला तरी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई कधी मिळणार असा प्रश्न आहे.