३८ टक्के खातेदार शेतकऱ्यांच्या पदरामध्ये २२६ कोटींचे पीकविमा अग्रीम

By हरी मोकाशे | Published: July 4, 2024 07:31 PM2024-07-04T19:31:55+5:302024-07-04T19:44:28+5:30

गतवर्षीचा खरीप : केवळ सव्वातीन लाख अर्जदारांची बोळवण

226 crore crop insurance advance in the category of 38 percent account holder farmers | ३८ टक्के खातेदार शेतकऱ्यांच्या पदरामध्ये २२६ कोटींचे पीकविमा अग्रीम

३८ टक्के खातेदार शेतकऱ्यांच्या पदरामध्ये २२६ कोटींचे पीकविमा अग्रीम

लातूर : गेल्या वर्षीच्या खरीपात पावसाचा विलंब आणि २१ दिवसांपेक्षा अधिकच्या खंडामुळे सोयाबीनच्या उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना २५ टक्के पीकविमा अग्रीमची आशा होती. परंतु, प्रत्यक्षात केवळ ३८ टक्के अर्थात ३ लाख २५ हजार ७८६ खातेदार शेतकऱ्यांना लाभ मिळाला. परिणामी, उर्वरित शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे.

गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात ५ लाख ८५ हजार ९७७ हेक्टरवर पेरा झाला होता. त्यात सर्वाधिक ४ लाख ९७ हजार २३१ हेक्टरवर सोयाबीनचा पेरा होता. दरम्यान, पावसाने ताण दिल्याने उत्पादनात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाल्याचे हंगाम मध्य परिस्थितीच्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व मंडळातील पीकविमाधारकांना २५ टक्के आग्रीम देण्याचे आदेश दिले होते. तेव्हा पीकविमा कंपनीने विभागीय आयुक्त, राज्य आणि केंद्र शासनाकडे धाव घेत आक्षेप सादर केले होते.

पीक संरक्षणासाठी साडेआठ लाख अर्ज...
प्रधानमंत्री पीकविमा योजनेअंतर्गत गेल्या वर्षी ८ लाख ६१ हजार ६७५ अर्ज दाखल झाले होते. ५ लाख ९९ हजार १४२ हेक्टरवरील पीक संरक्षित करण्यात आले होते. दरम्यान, जिल्ह्यातील ३ लाख २५ हजार ७८६ खातेदार शेतकऱ्यांना २२६ कोटी ४१ लाख ३२ हजार ३५ रुपयांची नुकसान भरपाई मिळाली आहे.

२१ दिवसांच्या खंडाचा ३ लाख अर्जदारांना लाभ...
गेल्या वर्षीच्या जुलै आणि ऑगस्टच्या कालावधीत पावसाने २१ दिवसांपेक्षा अधिक ताण दिला होता. त्यामुळे सोयाबीन उत्पन्नात ६० टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली. जिल्ह्यातील सर्व खातेदार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळणे अपेक्षित होते. परंतु, केवळ ३२ मंडळातील ३ लाख ८ हजार ९२४ अर्जदारांना २५ टक्क्यांप्रमाणे २१० कोटी ५८ लाख १३ हजार ८९४ रुपयांची भरपाई मिळाली आहे. अद्यापही उर्वरित ७५ टक्के भरपाई मिळाली नाही.

तीन प्रकारांत मिळाली भरपाई...
नैसर्गिक आपत्ती - ११ कोटी ३३ लाख
काढणी पश्चात - ३ कोटी ९५ लाख
पावसाचा ताण - २१० कोटी ५८ लाख
एकूण - २२६ कोटी ४१ लाख

लातूर तालुक्यास सर्वाधिक पीकविमा...
तालुका - विमा वितरण

अहमदपूर - २ कोटी ७७ लाख
औसा - ५३ कोटी ७० लाख
चाकूर - ३५ कोटी ९२ लाख
देवणी - ६६ लाख ७० हजार
जळकोट - ८ कोटी ४१ लाख
लातूर - ५९ कोटी ८२ लाख
निलंगा - ४२ कोटी ३४ लाख
रेणापूर - ६ कोटी ४८ लाख
शिरुर अनं. - ६ कोटी ६५ लाख
उदगीर - ९ कोटी ९३ लाख
एकूण - २२६ कोटी ४१ लाख

सातत्याने पाठपुरावा...
गेल्या वर्षीच्या खरीपात ८ लाख ६१ हजार ६७५ खातेदार शेतकऱ्यांनी ५ लाख ९९ हजार १४२ हेक्टरवरील पीक संरक्षित केले होते. त्यापैकी ३ लाख २५ हजार ७८६ अर्जदारांना भरपाई देण्यात आली आहे. अधिकाधिक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून जिल्हा प्रशासनाने पीकविमा कंपनीकडे सातत्याने पाठपुरावा केला.
- रमेश जाधव, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

Web Title: 226 crore crop insurance advance in the category of 38 percent account holder farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.