लातूर जिल्ह्यात ५५ केंद्रावर २५ हजार विद्यार्थी देणार नीटची परीक्षा
By संदीप शिंदे | Published: April 27, 2024 04:26 PM2024-04-27T16:26:16+5:302024-04-27T16:26:20+5:30
लातूर, उदगीर, निलंगा, अहमदपूर येथील केंद्रांचा समावेश
लातूर : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या नॅशनल इलिबिजिलीटी कम इन्ट्रास टेस्ट अर्थात नीट परीक्षा ५ मे रोजी होणार असून, लातूर जिल्ह्यात २४ हजार ८८१ विद्यार्थी या परीक्षेस सामोरे जाणार आहेत. परीक्षेसाठी ५५ केंद्रांची निर्मिती करण्यात आली असून, यामध्ये लातूर, उदगीर, निलंगा, अहमदपूर या शहरातील केंद्रांचा समावेश आहे.
लातूरात वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी संपुर्ण महाराष्ट्रातून विद्यार्थी येत असतात. यामध्ये अनेकांचे वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश निश्चित होतात. त्यामुळे लातूरात तयारी करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. २०२४ या वर्षांतील नीट परीक्षा ५ मे रोजी जिल्ह्यातील ५५ केंद्रावर होणार आहे. दुपारी २ ते ५ या वेळेत ही परीक्षा होणार असून, नॅशनल टेस्टींग एजन्सीच्या नियमावलीनुसार दिलेल्या वेळेआधीच विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश करावा लागणार आहे. २४ हजार ८८१ विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जाणार असून, गुरुवारपासून या परीक्षेचे प्रवेशपत्र वाटप सुरु झाले आहे. परीक्षेचे नियोजन करण्यात आले असून, ५५ केंद्रावर २८ हजार ८८१ विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार असल्याचे समन्वयक तथा पोदार इंटरनॅशनल स्कुलचे प्राचार्य गिरीधर रेड्डी, समन्वयक विकास लबडे यांनी सांगितले.
यंदाही ग्रामीण भागात परीक्षा केंद्र...
मागील वर्षीप्रमाणे यंदाही उदगीर, निलंगा आणि अहमदपूर शहरात परीक्षा केंद्र आले आहेत. परीक्षा केंद्रावर येण्याची वेळ, तसेच केंद्रावर घ्यावयाची काळजी याबाबतची माहिती एनटीएकडून उपलब्ध करुन देण्यात आली आहे. प्रवेशपत्र वाटपास सुरुवात झाली आहे.