ट्रान्सफार्मर जळाल्याने उदगीरातील २५ गावे चार दिवसांपासून अंधारात
By हरी मोकाशे | Published: September 8, 2022 05:56 PM2022-09-08T17:56:46+5:302022-09-08T17:57:42+5:30
बहुतांश गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचीही समस्या
उदगीर (जि. लातूर) : ग्रामीण भागासाठी वीज पुरवठा करण्यासाठीचा १३२ केव्ही उपकेंद्रातील १६ एमव्हीए क्षमतेचा एक ट्रान्सफार्मर जळाल्याने चार दिवसांपासून तालुक्यातील २५ गावांसह शहरातील काही भाग अंधारात आहे. वीजपुरवठा बंद झाल्यामुळे बहुतांश गावांत पिण्याच्या पाण्याचीही समस्या निर्माण झाली आहे.
तालुक्यातील गावांच्या वीज पुरवठ्यासाठीच्या १३२ केव्ही उपकेंद्रातील १६ एमव्हीए क्षमतेचा ट्रान्सफार्मर चार दिवसांपूर्वी जळाला आहे. परिणामी, शेल्हाळ, तोंडचिर, तादलापूर, बेलसकरगा, धोंडीहिप्परगा, शिरोळ, जानापूर, कौळखेड, मलकापूर, माळेवाडी, बनशेळकी, भोपणी, नेत्रगाव, जकनाळ, मादलापूर, मलकापूरसह अन्य वस्ती, तांडे तसेच शहरातील रेल्वे स्टेशन समोरील भाग, समतानगर, गोपाळनगर, संतोषीमाता नगर, दत्त नगर, बनशेळकी रोड, एसटी कॉलनी, बिदर रस्त्यावरील उड्डाणपूलाच्या उजवीकडील भागातील वीजपुरवठा विस्कळीत झाला आहे.
वीजपुरवठा विस्कळीत झाल्याने काही गावांतील जलयोजनाही बंद पडल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. महावितरण व महापारेषणमधील अधिकाऱ्यांत सुसंवाद नसल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, महावितरणकडे चौकशी केली असता हे काम महापारेषणकडे असल्याचे सांगून हात झटकत असल्याचे नागरिकांनी सांगितले. दरम्यान, महापारेषणचे अधिकारी ट्रान्सफार्मर उपलब्ध झाल्यानंतर वीजपुरवठा सुरळीत होईल, असे सांगत आहेत.
ट्रान्सफार्मरची जबाबदारी महापारेषणची...
महावितरणचे वरिष्ठ अभियंता दराडे म्हणाले, चार दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसात ट्रान्सफॉर्मवर वीज पडल्यामुळे तो जळाला. हा ट्रान्सफॉर्मर बदलण्याची जबाबदारी महापारेषणची आहे. लवकरात लवकर वीजपुरवठा सुरु करण्याचा प्रयत्न आहे.
ट्रान्सफार्मर आणण्याची प्रक्रिया सुरु...
महापारेषणचे उपकार्यकारी अभियंता डी.डी. मरलापल्ले म्हणाले, चार दिवसांपूर्वी ट्रान्सफार्मर जळाला आहे. तो जुना होता. नवीन ट्रान्सफॉर्मर जालन्याहून आणण्याचे काम सुरु आहे. गुरुवारी दुपारपर्यंत ट्रान्सफॉर्मर उदगीरात येणे अपेक्षित होते. परंतु पावसामुळे अहमदपूर- उदगीर रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरची वाहतूक करणे शक्य नसल्याने तो जांब, जळकोटमार्गे आणण्याची प्रक्रिया सुरू आहे. ट्रान्सफॉर्मर बसविल्यानंतर किमान एक दिवस तरी त्याची पूर्णपणे तपासणी करूनच वीजपुरवठा करावा लागतो. त्यानंतरच महावितरणकडे वीजपुरवठा सुरू होईल. या सर्व बाबी तांत्रिक असल्याने किती वेळ लागेल, हे निश्चित सांगता येत नाही.