विद्यापीठ खेळाडूंना पुन्हा २५ वर्षाची अट; कोरोनामुळे दिलेली सवलत खंडित
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 07:39 PM2023-08-21T19:39:25+5:302023-08-21T19:40:27+5:30
दोन वर्षे स्पर्धा न झाल्याने खेळाडूंचे नुकसान झाले होते. त्याची दखल घेत भारतीय विश्वविद्यालय संघाने खेळाडूंना स्पर्धेसाठी खेळण्यासाठीच्या वयोमर्यादेत वाढ केली होती.
- महेश पाळणे
लातूर : कोरोना काळात नुकसान झालेल्या खेळाडूंसाठी भारतीय विश्वविद्यालय संघाने मागील दोन वर्षी वयोमर्यादा वाढविली होती. त्यामुळे खेळाडूंचे नुकसान टळले. आता स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पूर्ववत २५ वर्षांची अट खेळाडूंना लागू करण्यात आली आहे.
कोरोना काळात दोन वर्ष अनेक क्षेत्रांचे नुकसान झाले. त्यात क्रीडाक्षेत्रही होते. दोन वर्षे स्पर्धा न झाल्याने खेळाडूंचे नुकसान झाले होते. त्याची दखल घेत भारतीय विश्वविद्यालय संघाने खेळाडूंना स्पर्धेसाठी खेळण्यासाठीच्या वयोमर्यादेत वाढ केली होती. सन २०२१- २२ या काळात वयोमर्यादा २५ वरून २६ वर्षे अशी करण्यात आली होती. त्यानंतर सन २०२२- २३ साठी वयोमर्यादा २७ वर्ष करण्यात आली होती. त्यामुळे खेळाडूंचे दोन वर्षांचे नुकसान भरून निघाले. त्यानंतर आता यंदाच्या अकॅडमिक वर्षात खेळाडूंना स्पर्धेत भाग घेण्याची अट पूर्वीप्रमाणेच २५ वर्षे करण्यात आली आहे. याबाबतचे परिपत्रक भारतीय विश्वविद्यालय संघाने सर्व कुलगुरूंना पाठविले आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षात सहभागी होणाऱ्या खेळाडूंना २५ वर्षाची वयोमर्यादा कायम राहणार आहे. सन २०२०- २१ साली आंतर विद्यापीठ व क्रीडा महोत्सव ही स्पर्धा झाली नाही, तर २०२१- २२ काळात काही खेळांच्या स्पर्धा आंतर विद्यापीठ स्तरावर झाल्या. मात्र क्रीडा महोत्सव या वर्षात झाला नाही.
कमीत कमी वय १७ वर्षे...
विद्यापीठ स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंचे कमीत कमी वय १७ वर्षे पूर्ण आवश्यक आहे व जास्तीत जास्त वय २५ वर्षे असणे गरजेचे आहे. आंतर विद्यापीठ स्पर्धेच्या दिवशी त्याने १७ वर्षे पूर्ण केलेले असावे. तसेच २५ वर्षाची वयोमर्यादा त्या-त्या वर्षी १ जुलैपर्यंत ग्राह्य धरण्यात येणार आहे.
पूर्वीप्रमाणेच वयाची अट...
यंदाच्या आंतर महाविद्यालयीन व आंतर विद्यापीठ स्पर्धेत खेळाडूंची वयोमर्यादा २५ वर्ष राहणार आहे. त्यामुळे विद्यापीठातील सर्व महाविद्यालय व खेळाडूंनी त्याची नोंद घ्यावी आणि त्याप्रमाणेच खेळाडूंना सहभागी करून घ्यावे.
- प्रा. डॉ. मनोज रेड्डी, क्रीडा संचालक, स्वारातीम विद्यापीठ, नांदेड.