लातूर जिल्हा परिषदेच्या २७ कर्मचाऱ्यांना बढती, आनंदाने फुलले चेहरे
By हरी मोकाशे | Published: October 18, 2023 07:11 PM2023-10-18T19:11:16+5:302023-10-18T19:11:44+5:30
बढतीमध्ये आरोग्य विभागाचे कर्मचारी सर्वाधिक आहेत
लातूर : जिल्हा परिषदेअंतर्गत असलेल्या २७ कर्मचाऱ्यांना बुधवारी पदोन्नती देण्यात आली आहे. समुपदेशानाने ही प्रक्रिया पार पडली. त्यामुळे अपेक्षित ठिकाण मिळाले आहे. बढती मिळाल्याने या कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.
जिल्हा परिषदेत गेल्या महिनाभरापासून पदोन्नतीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे बढतीस पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांची उत्सुकता वाढली होती. गेल्या महिन्यात बढती प्रक्रिया पार पडली असली तरी शासन नियमाप्रमाणे नियुक्ती आदेश ऑक्टोबरमध्ये देणे आवश्यक होते. त्यामुळे आता ही प्रक्रिया सुरू आहे. बुधवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, कृषी विकास अधिकारी सुभाष चोले यांची उपस्थिती होती. यावेळी आरोग्य पर्यवेक्षक-३, आरोग्य सहायक (पु.) २, आरोग्य सहायक (महिला) १९ तसेच विस्तार अधिकारी (कृषी)-१ आणि पशुधन पर्यवेक्षक-२ अशा एकूण २७ जणांना पदोन्नती देण्यात आली आहे. ही प्रक्रिया समुपदेशनाने पार पडली.
आदेश घेऊन कार्यालयाबाहेर...
जिल्हा परिषदेअंतर्गत एकूण २७ जणांना पदोन्नती देण्यात आली आहे. समुपदेशनाने ही प्रक्रिया पार पडली. तात्काळ बढतीचे आदेश देण्यात आले आहेत.
- नितीन दाताळ, डेप्युटी सीईओ, सामान्य प्रशासन.