उमराह (हज) यात्रेच्या नावाखाली २७ जणांची फसवणूक, औरंगाबाद, मुंबईच्या एजंटांचा समावेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2019 10:16 PM2019-05-19T22:16:41+5:302019-05-19T22:16:45+5:30
उमराह (हज) यात्रेच्या नावाखाली एकूण २७ जणांना फसविल्याची घटना घडली.
लातूर : उमराह (हज) यात्रेच्या नावाखाली एकूण २७ जणांना फसविल्याची घटना घडली. याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून औरंगाबाद व मुंबई येथील चौघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी सांगितले, शहरातील फिर्यादी कासिम मोहम्मदसाब शेख (६८, रा. खोरी गल्ली, लातूर) हे एस.टी. महामंडळातील सेवानिवृत्त मेकॅनिक आहेत. त्यांनी अल बुराक या ट्रॅव्हल्स कंपनीकडे एजंटामार्फत हज यात्रेसाठी रक्कम भरली होती. २७ जून २०१८ पासून हे १७ मे २०१९ या कालावधीत एकूण २७ यात्रेकरूंनी प्रती ३५ हजार रुपये प्रमाणे ९ लाख ५० हजार रुपये संबंधितांकडे जमा केले होते. या सर्व यात्रेकरूंना आॅक्टोबर व नोव्हेंबर २०१८ मध्ये मुंबईहून यात्रेला पाठविण्याचे ठरले होते. यात्रेसाठी जाणाऱ्या एकूण २७ यात्रेकरूंचे जाण्या-येण्याचे तिकीट व मुक्कामासह भोजनाची व्यवस्था करण्यात येणार होती. आॅक्टोबर २०१८ मध्ये यात्रेकरूंना यात्रेस पाठविण्यासाठी ११ आॅक्टोबर २०१८ रोजी आपण व्हिसा काढला असता फक्त १३ यात्रेकरूंना १९ आॅक्टोबर २०१८ रोजी मुंबईहून जद्दा येथे पाठविले. जद्दा येथून मुंबईला परत येण्याचे ४ नोव्हेंबर २०१८ रोजी विमानाचे तिकीट दिले होते. राहिलेल्या १४ यात्रेकरूंना पाठवितो म्हणून शेवटपर्यंत पाठविले नाही. १३ यात्रेकरू यात्रेसाठी गेल्यानंतर त्या शहरात नोंदणी केलेल्या हॉटेल मालकाने त्यांना केवळ चार दिवस राहण्याची व भोजनाची व्यवस्था केली. त्यानंतरची नोंदणी नसल्याने हॉटेलमधून हाकलून देण्यात आले. त्यामुळे यात्रेकरूंना फुटपाथवर राहून दिवस काढावे लागले, असे फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत औरंगाबाद येथील पडेगाव मधील प्रियदर्शिनी कॉलनीत राहणाºया मीर इरशाद अली व मीर जाहेद अली यांनी स्वत:च्या घरी भेटीसाठी आलेल्या यात्रेकरूंना चार दिवसांच्या वाटाघाटीनंतर १४ लोकांचे पैसे परत पाठविल्याबाबतचा धनादेश २० एप्रिल २०१९ रोजी दिला होता. मात्र तो वटला नाही. पुन्हा नुकसानभरपाईपोटी प्रत्येकी १५ हजार रुपयांप्रमाणे एकत्रित रकमेचा धनादेश दिला असता तोही वटला नाही. यातून आपली फसवणूक झाल्याचे यात्रेकरूंच्या लक्षात आले.
याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कासिम मोहम्मदसाब शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मीर इरशाद अली, मीर जाहीद अली, अल बुराकचे मालक व व्यवस्थापकाविरुद्ध गु.र.नं. २०६/२०१९ कलम ४२०, ४०६, ५०४, ५०६, ३४ भादंविप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.