लातूरमध्ये २८२ गावांना स्मशानभूमीच नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 06:11 PM2018-09-03T18:11:58+5:302018-09-03T18:21:05+5:30
लातूर जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये स्मशानभूमीचा प्रश्न असून, काही गावांच्या स्मशानभूमीला रस्ताही नाही.
लातूर : लातूर जिल्ह्यातील बहुतांश गावांमध्ये स्मशानभूमीचा प्रश्न असून, काही गावांच्या स्मशानभूमीला रस्ताही नाही. तर काही गावांत स्मशानभूमीच नाही. जागा, जमीन नसणा-या अनेक लोकांना अंत्यसंस्कार कोठे करावे, असा प्रश्न निर्माण होतो. जिल्ह्यात २८२ गावांत स्मशानभूमी नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. तर २६१ गावांमध्ये स्मशानभूमीला शेड नाही. त्यामुळे पावसाळ्यात अंत्यसंस्कार करताना अडचणी निर्माण होतात.
‘एक गाव - एक स्मशानभूमी’ असा प्रयोग मागच्या काळात लातूर जिल्ह्यात राबविण्यात आला होता. ज्या गावात सर्व जाती-धर्मीयांसाठी एक स्मशानभूमी आहे, त्या गावात तत्कालीन खा. डॉ. जनार्दन वाघमारे यांनी मोठ्या प्रमाणात खासदार निधी दिला होता. स्मशानभूमीच्या रस्त्यासह स्मशानभूमीतील आसरा खासदार निधीतून करण्यात आला. शिवाय अशा गावांना बस थांब्यासाठीही शेड तयार करून दिले होते. आता सद्य:स्थितीत लातूर जिल्ह्यात २६१ गावांमध्ये स्मशानभूमी आहे. त्या स्मशानभूमीत शेड नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर अंत्यसंस्कार करण्यास अडचणी निर्माण होतात. तर २८२ गावांमध्ये स्मशानभूमीच नाही. ज्यांना जागा-शेती आहे, ते तेथे त्यांच्या मयत नातेवाईकांचा अंत्यसंस्कार करतात. परंतु, ज्यांना जागाच नाही, त्यांना स्मशानभूमीची गरज वाटते. त्यामुळे २८२ गावांतील ग्रामपंचायतींनी स्मशानभूमीला जागा मिळावी म्हणून जिल्हा परिषदेला प्रस्ताव पाठविले आहेत. मात्र त्या प्रस्तावांवर अद्याप चर्चा नाही. शिवाय, २६१ गावांत शेडचेही प्रस्ताव आहेत. जिल्हा नियोजन समितीकडून स्मशानभूमीच्या जागेसाठी तसेच शेडसाठी तरतूद करावी, अशी मागणी काही ग्रामपंचायतींनी केली आहे.
सिमेंट रस्ते व नाले बांधकामासाठी प्राधान्य...
बहुतांश ग्रामपंचायती नियोजन समितीकडे गावातील रस्ते, सिमेंट नाले बांधकामासाठी कामे प्रस्तावीत करतात. परंतु, स्मशानभूमी व त्या विकासासाठी प्रस्ताव पाठविले जात नाहीत. शिवाय, नियोजन समिती अथवा शासनाकडूनही स्मशानभूमीचा प्रश्न अजेंड्यावर घेतला जात नाही. लातूर शहरालगत असलेल्या वाडी-वस्त्यांनाही स्मशानभूमीचा प्रश्न भेडसावत आहे.
गाव तिथे स्मशानभूमी...
गाव तिथे सार्वजनिक स्मशानभूमी असणे आवश्यक आहे. मात्र लातूर जिल्ह्यातील २८२ गावांमध्ये स्मशानभूमी नाही. तर अनेक गावांतील स्मशानभूमींना रस्ता नाही. ज्या गावात स्मशानभूमी नाही, अशा गावांतील लोक नदीकाठी, सार्वजनिक जागेत अंत्यसंस्कार करतात.