लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना घडणार विज्ञान सफर; ३० जणांच्या निवडीसाठी अंतिम परीक्षा उद्या

By संदीप शिंदे | Published: March 9, 2023 05:38 PM2023-03-09T17:38:28+5:302023-03-09T17:38:55+5:30

प्रत्येक तालुक्यातून प्रत्येकी तीन विद्यार्थ्यांची होणार निवड

30 students of Latur district will have a science trip | लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना घडणार विज्ञान सफर; ३० जणांच्या निवडीसाठी अंतिम परीक्षा उद्या

लातूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना घडणार विज्ञान सफर; ३० जणांच्या निवडीसाठी अंतिम परीक्षा उद्या

googlenewsNext

लातूर : जिल्हा परिषद शाळांतील पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी, शास्त्रज्ञांच्या कार्यपद्धतीची ओळख व्हावी यासाठी स्पर्धा परीक्षेद्वारे प्रत्येक तालुक्यातील तीन विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. त्यानुसार तालुकास्तरावर निवडलेल्या विद्यार्थ्यांची शुक्रवारी जिल्हास्तरावर परीक्षा घेतली जाणार आहे. यामध्ये प्रत्येक तालुक्यातून तीन असे एकूण ३० विद्यार्थी हवाई, विज्ञान सफरीसाठी निवडले जाणार आहे.

जिल्ह्यातील दहाही तालुक्यातील १ हजार २० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यामध्ये प्रत्येक तालुक्यातून दहा विद्यार्थी निवडण्यात आले आहेत. आता जिल्हास्तरावर दहाही तालुक्यातील १०० विद्यार्थी परीक्षा देणार असून, यामध्ये ३० विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अंतरिक्ष केंद्र श्रीहरीकोटा, थुंबा स्पेस म्युझियम तिरुअनंतपूरम, विश्वेश्वरय्या इंडस्ट्रीयल ॲन्ड टेक्निकल म्युझियम बेंगळुरू येथे शैक्षणिक सहलीसाठी पाठविले जाणार आहे.

शिक्षण विभागाकडून परीक्षेसाठी अभ्यासक्रम...

शैक्षणिक सहलीसाठी विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घेण्यात येत आहे. यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयाने दिलेल्या अभ्यासक्रमाचा समावेश आहे. २५ फेब्रुवारी रोजी शाळा, २७ फेब्रुवारी केंद्र, ३ मार्च रोजी तालुकास्तरावर परीक्षा झाली. आता १० मार्च रोजी जिल्हास्तरावर परीक्षा होणार आहे. यासाठी प्रत्येक तालुक्यातून दहा विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

सेस फंडातून सहलीचा होणार खर्च...
जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून या शैक्षणिक सहलीसाठी खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये विमान तिकीट, विद्यार्थ्यांना गणवेश, जेवण, निवास आदी खर्चांचा समावेश आहे. श्रीकिशन सोमानी विद्यालयात शुक्रवारी सकाळी १० ते ५ या वेळेत परीक्षा होणार असून, २ तास लेखी आणि ३ तास प्रात्यक्षिक परीक्षा होणार असल्याचे प्राथमिक शिक्षण विभागातून सांगण्यात आले.

Web Title: 30 students of Latur district will have a science trip

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.