आजचा दिवस हा अस्वस्थ करणारा, अंगावर शहारा येतो; शरद पवारांनी दिला आठवणींना उजाळा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2023 03:47 PM2023-09-30T15:47:22+5:302023-09-30T15:48:19+5:30

कि्ल्लारीतील परिस्थिती अत्यंत बिकट होती. आयुष्यात कधीही पाहू नये असं हे संकट होतं असं शरद पवारांनी म्हटलं.

30 years of Latur Killari earthquake, Sharad Pawar remembers memories | आजचा दिवस हा अस्वस्थ करणारा, अंगावर शहारा येतो; शरद पवारांनी दिला आठवणींना उजाळा

आजचा दिवस हा अस्वस्थ करणारा, अंगावर शहारा येतो; शरद पवारांनी दिला आठवणींना उजाळा

googlenewsNext

लातूर - लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरात झालेल्या भूकंपाला आज ३० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा कृतज्ञता सोहळा पार पडला. या भूकंपावेळीशरद पवार मुख्यमंत्री होते. किल्लारीला पुन्हा उभं करण्यात शरद पवार यांचं मोठं योगदान होते. त्यामुळे भूकंपग्रस्त किल्लारीवासीयांनी आज शरद पवार यांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे. इथं शरद पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. आजचा दिवस हा अस्वस्थ करणारा आहे. या दिवसाच्या आठवणींनी आजही अंगावर शहारा येतो असं शरद पवारांनी सांगितले.

शरद पवार म्हणाले की, राज्याच्या मुख्यमंत्र्यावर अनेक जबाबदाऱ्या असतात. त्यातील एक जबाबदारी म्हणजे गणपती विसर्जनाचा दिवस. राज्यातील शेवटचा गणपती विसर्जन होत नाही. तोपर्यंत मुख्यमंत्र्याला झोप लागत नाही. त्यादिवशी पावणे चार वाजता मी झोपायला गेलो आणि अंग टाकतो तोच माझ्या घराच्या खिडक्या हालल्या. माझ्या लक्षात आलं की, भूकंप झाला आहे. त्यामुळे मी आधी साताऱ्याला फोन केला. विचारलं की, कोयनेला भूकंप झाला आहे का? त्यावेळी मला त्यांनी सांगितलं की, भूकंप इथं नाही तर लातूर जिल्ह्यात झाला आहे. त्यानंतर मी लगेच विमानाची व्यवस्था केली. सोलापूरला येऊन किल्लारी गावात पोहोचलो असे शरद  पवार यांनी सांगितले

तसेच कि्ल्लारीतील परिस्थिती अत्यंत बिकट होती. आयुष्यात कधीही पाहू नये असं हे संकट होतं. केवळ औसाच नव्हे तर उमरगा तालुक्यात आणि आसपास हीच स्थिती होती. ते चित्र पाहून आम्ही तात्काळ सर्व मदतकार्य सुरु केलं. तेव्हाच मी सगळ्या पदाधिकाऱ्यांना कळवलं आणि सकाळी ६ वाजता विमानाची मागणी केली आणि आम्ही पोहचलो. आम्ही बघितल तर आम्हाला किल्लारी दिसलं नाही. निसर्गाची अवकृपा झाली होती. त्यानंतर पुढच्या २-३ तासात जवळच्या जिल्ह्यातील डॉक्टर आणि अधिकाऱ्यांना बोलवून घेतलं. पुनर्वसनाचे काम सुरू झाले. मी तिथेच मुक्काम केला काम सुरू झालं. संकट मोठं होतं पण दोन्ही तालुक्यातील लोकांनी धैर्याने संकटाला तोंड दिलं असं कौतुक शरद पवारांनी केले.

बैलगाडीत एक व्यक्ती झोपली होती, तिला उठवलं तर ती...

सकाळी 7 ला उठून रात्री दोन तीन वाजेपर्यंत काम करायचे. पुन्हा मुक्कामी सोलापूरला जायचे. असं हे अधिकारी काम करत होते. मला समाधान वाटतं की, एवढे मोठे संकट येऊनही दोन तीन जिल्ह्यातील लोकांनी अतिशय धैर्याने लढा दिला आहे. विलासराव देशमुख, पद्मसिंह पाटील आणि जिल्हाधिकारी प्रविणसिंह परदेशी यांनी खूप काम केलं. मला आठवते की, रस्त्याच्या कडेला असलेल्या एका बैलगाडीत एक व्यक्ती झोपलेली होती. मी त्याना उठवून विचारले तेव्हा लक्षात आलं की, ते जिल्हाधिकारी प्रविणसिंह परदेशी होते. या सगळ्या लोकांनी झोकून देऊन काम केलं, अशी आठवण शरद पवार यांनी सांगितली.

देशातील आपत्ती निवारण यंत्रणेचा उगम किल्लारीच्या घटनेतून झाला

संकटात अनेक लहान मुलं सापडली होती. त्या मुंलांची पुण्यात व्यवस्था केली. त्या मुलांनी उत्तम शिक्षण घेतले. ते चांगल्या ठिकाणी कामाला लागले. मला हा कार्यक्रम माहित नव्हता. कृतज्ञतेची काही गरज नव्हती. पण संकटातील लोकांना मदत करण्याची शिकवण ही यशवंतराव चव्हाण यांच्याकडून मिळाली. किल्लारी सावरायला पैसै नव्हते मी अर्थमंत्री मनमोहन सिंह यांना अडचण सांगितली. त्यांनी कोट्यवधी रक्कम १० दिवसांत उपलब्ध करुन दिली. देशाचे पंतप्रधान तीन दिवसांत येणारं होते मी सांगितलं यायचं नाही कारण ते आले तर सगळे अधिकारी त्यात अडकतील आणि जखमी लोकांकडे दुर्लक्ष होईल. त्यांनी ऐकलं आणि ते आले नाहीत. आपत्ती निवारण यंत्रणा आपल्याकडे नव्हती त्यावेळी प्रामुख्यानं हा विषय मांडला आणि त्यानंतर मला त्याची जबाबदारी माझ्यावर देण्यात आली. सोनिया गांधी यांनी माझ्यावर ती जबाबदारी सोपवली. मी दोन वर्ष काम केलं आणि देशात आपत्ती निवारण यंत्रणा उभारली. याचा उगम किल्लारी येथून झाला आहे असं शरद पवारांनी म्हटलं.

दरम्यान, अनेक कुटुंबातील प्रमुख माणसं गेली होती त्यावेळी शांतीलाल मुथा यांच्यावर एक जबाबदरी दिली. त्यांनी पुण्यात एक इमारत बांधून त्याठिकाणी इथल्या मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था केली. घरचे पालक नसले तरी शांतीलाल मुथा हे त्यांचे पालक झाले. कृज्ञताची आवश्यकता नव्हती परंतु  हे संस्कार यशवंतराव चव्हाण यांचे आहेत. साडे आठ हजार येथील नागरिकांचा इथे मृत्यू झाला होता असं सांगत शरद पवार भावूक झाले.

Web Title: 30 years of Latur Killari earthquake, Sharad Pawar remembers memories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.