चार महसूल मंडळातील २९ हजार शेतकऱ्यांना ३२ कोटींचा पीकविमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2019 05:43 PM2019-11-26T17:43:11+5:302019-11-26T17:44:54+5:30
लातूर, औसा तालुक्यातील ५८ गावांचा समावेश
- संदीप शिंदे
लातूर : खरीप हंगामात पेरणी न झालेल्या लातूर जिल्ह्यातील दोन तालुक्यातील चार महसूल मंडळातील २९ हजार २१३ शेतकऱ्यांना ३२ कोटी ७३ लाख ४ हजार ३७६ रुपयांचा पीकविमा मिळाला आहे. संबंधित पीकविमा कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर विमा वर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे पेरणी न केलेल्या परंतु पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
जुन-जुलै महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्याने लातूर व औसा तालुक्यातील अनेक गावांत खरीप पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे या भागात बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी केली नव्हती. जवळपास ८० हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र पेरणीविना राहिले होते. पेरणीपूर्व या भागातील शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता. विमा भरल्यानंतर पेरणी झाली नाही तरी २५ टक्के पीकविमा देण्याची तरतुद आहे. त्यानुसार लातूर तालुक्यातील तांदुळजा महसूल मंडळातील ८ हजार ८११ शेतकऱ्यांना १२ कोटी ७६ हजार ४४५ रुपये, कन्हेरी महसूल मंडळातील ३ हजार ७१६ शेतकऱ्यांना ४ कोटी ९८ लाख ५९ हजार ८६१ रुपये तर औसा तालुक्यातील लामजना महसूल मंडळातील १० हजार ३१४ शेतकऱ्यांना ९ कोटी ९७ लाख ४९ हजार ३३० रुपये, किल्लारी महसूल मंडळातील ६ हजार ३७२ शेतकऱ्यांना ५ कोटी १० लाख ४८ हजार ७४० रुपये पीकविमा मंजूर करण्यात आला आहे. लातूर महसूल मंडळातील तांदुळजा आणि कन्हेरी या दोन महसूल मंडळातील तांदुळजा, टाकळगाव, कानडी बोरगाव, वांजरखेडा, सारसा, बोडका, गादवड, मसला, जवळगा बु, कासार जवळा, वाकडी, रामेश्वर, रुई, दिंडेगाव, गांजूर, ताडकी, भोसा, पिंपळगाव अंबा, कन्हेरी, वासनगाव, खोपगाव, पेठ, चांडेश्वर, कव्हा आणि कातपुर या गावांचा समावेश आहे. पिकविम्याची रक्कम संबंधित कंपनीच्या वतीने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांना पिकविम्याचे पैसे मिळाल्याने दिलासा मिळाला असून, यामुळे रबी पेरणीसाठी आर्थिक मदत होणार आहे.
औसा तालुक्यातील सर्वाधिक गावे...
पेरणी न झालेल्या औसा तालुक्यातील दोन महसूल मंडळातील सर्वाधिक गावांना २५ टक्के पीकविमा मिळाला आहे. यामध्ये किल्लारी महसूल मंडळातील किल्लारी १, किल्लारी २, किल्लारीवाडी, हारेगाव, लिंबाळा दाऊ, संक्राळ, तळणी, बानेगाव, सिरसल, येळवट, चिंचोली जो, गोटेवाडी, कारला, पारधेवाडी तर लामजना महसूल मंडळातील लामजना, हटकरवाडी, दावतपुर, उत्का, खरोसा, रामेगाव, किनीवरे, तांबरवाडी, राजेवाडी, चिंचोली तपसे, जवळगा पो, गाढवेवाडी, मोगरगा, कुमठा, शिवणी लक, आनंदवाडी, रामवाडी, मंगरूळ या गावांचा समावेश आहे.
खरीप पिकविम्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा...
खरीप हंगामात जिल्ह्यातील ११ लाखहुन अधिक शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता. पेरणी न केलेल्या शेतकऱ्यांना २५ टक्के पीकविमा मिळाला आहे. त्यामुळे पेरणी केलेल्या आणि पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना पिकविम्याची प्रतीक्षा आहे. परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे अपेक्षित उत्पन्न मिळू शकलेले नाही. परिणामी, पिकविमा तरी लवकर मिळावा. अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. नुकसान झालेल्या पिकांचे सूचना पत्रही शेतकऱ्यांनी विमा कंपनीला भरून दिलेले आहे. त्यामुळे खरिपाचा पीकविमा कधी मिळणार असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.