३२४ पशुधन लम्पी रोगाने ग्रस्त; लसीकरणाची मेगा मोहीम, उपचारानंतर ७३ बरे
By हणमंत गायकवाड | Published: September 22, 2022 06:39 PM2022-09-22T18:39:03+5:302022-09-22T18:40:05+5:30
ज्या गावामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव असलेले पशुधन आढळलेले आहे, त्या गावाच्या ५ किमी अंतराच्या परिघातील गाय व बैल वर्गातील पशुधनाला लस दिली जात होती.
लातूर - लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढलेलाच असून, सुरुवातीला केवळ ८७ जनावरे बाधित होती. आता हा आकडा ४०४ वर पोहोचला असून, यातील ७३ पशुधन लम्पी चर्मरोगमुक्त झाली आहेत. हा वाढलेला प्रादुर्भाव लक्षात घेता पशुसंवर्धन विभागाने जिल्ह्यातील दहाही तालुक्यांत लसीकरणाची मेगा मोहीम हाती घेतली आहे. २३, २४ आणि २५ सप्टेंबर असे सलग तीन दिवस २०० पेक्षा जास्त गोवंश असलेल्या गावांमध्ये जनावरांना लस दिली जाणार आहे. लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव गाय व बैल वर्गामध्ये वाढत आहे. म्हैस वर्गात या आजाराचा प्रादुर्भाव नाही. त्यामुळे २ लाख ५५ हजार गाय व बैल वर्गातील पशुधनाला लस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
ज्या गावामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव असलेले पशुधन आढळलेले आहे, त्या गावाच्या ५ किमी अंतराच्या परिघातील गाय व बैल वर्गातील पशुधनाला लस दिली जात होती. या सुत्रानुसार एक लाख पशुधनाला लस देण्याचे उद्दिष्ट होते. त्यानुसार बुधवारपर्यंत ८० हजार पशुधनाला लस देण्यात आली आहे. आता २ लाख ५७ हजार पशुधनाला लस देण्याचे उद्दिष्ट आहे. ज्या गावामध्ये २०० पशुधन आहे, त्या गावामध्ये जाऊन लस देण्याचा कार्यक्रम गावनिहाय आखला आहे. त्याची सुरुवात २३ सप्टेंबरपासून होत असल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. राजकुमार पडिले यांनी दिली.
२०० पशुधन असलेल्या गावात जाऊन लसीकरण
जिल्ह्यातील दहाही तालुक्यांत २३, २४ आणि २५ सप्टेंबर रोजी लसीकरण केले जाणार आहे. तेरखेडा, माकणी, हालसी तुगाव, मदनसुरी, माळेगाव, सिंधीजवळगा, सोनसांगवी, धानोरा, शेंद, हणमंतवाडी, लाबोंटा, मसलगा, चिंचोलीवाडी, नणंद या गावांमध्ये २३ सप्टेेंबरला लसीकरण होणार आहे. २४ सप्टेंबर रोजी हलगरा, हंगरगा, तांबारवाडी, बामणी, येलम्मावाडी, वडगाव, दगडवाडी, लिंबाळा, ताजपूर, अंबेवाडी, जाजनुर, हणमंतवाडी, आदी गावांमध्ये लसीकरण होणार आहे.