३३ टक्के वाहनधारकांना विमा काढण्याचा विसर!
By आशपाक पठाण | Published: June 9, 2024 09:39 PM2024-06-09T21:39:09+5:302024-06-09T21:39:24+5:30
१८ लाखांचा दंड : तपासणीत ८३३४ पैकी २७७८ जणांकडे नव्हता विमा
आशपाक पठाण/ लातूर : वाहन खरेदी करताना काढलेला वाहनांचा विमा पुन्हा काढायचा म्हटलं की उगीच कशाला पैसे गुंतवायचे म्हणून अनेक वाहनधारक त्याकडे दुर्लक्ष करतात. रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांना विमा, फिटनेस, पीयुसी, चालकाकडे परवाना असणे अत्यावश्यक असताना अनेकजण याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे समोर आले आहे. लातूरच्या प्रादेशिक परिवहन विभागाच्या पथकांनी वर्षभरात तपासणी केलेल्या ८ हजार ३३४ वाहनांपैकी २ हजार ७७८ जणांकडे विमा नसल्याचे आढळून आले आहे.
वाहनाचा अपघात झाला, त्यात कोणाचा मृत्यू झाला किंवा वाहनांचे नुकसान, कुणी जखमी झाले तर त्याची नुकसान भरपाई कोण देणार? बरं अपघातात मयत झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देताना न्यायालय किती रक्कम मंजूर करील हे सांगणेही कठीण. वाहनधारकांना विम्याचे महत्व अनेकदा अपघात झाल्यावरच लक्षात येते. एरवी याकडे कोणी फारसे लक्ष देत नाही. विशेष करून दुचाकी, ऑटोरिक्षा, ट्रॅक्टरसह ग्रामीण भागातील वाहनधारक विमा काढण्याचे दुर्लक्ष करीत असतात. परिवहन विभागाच्या पथकाने वर्षभरात तपासणी केलेल्या एकुण वाहनांच्या जवळपास ३३ टक्के वाहनधारकांडे विमा आढळून आला नाही.
अपघात झाल्यास भरपाई देणार कोण...
वाहनांसाठी विमा अत्यावश्यक आहे. अनेकदा नवीन वाहन खरेदी करीत असताना आणि जुन्या वाहनांची खरेदी विक्री झाल्यावरच काहीजण विमा काढतात. तेही प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण होऊ नये म्हणून. आपल्या वाहनाचा अपघात झाला. त्यात कुणी मयत किंवा जखमी झाले त्याची भरपाई स्वत:च्या खिशातूनच करावी लागते. त्यामुळे स्वत: बरोबरच इतरांच्या सुरक्षेसाठी विमा आवश्यक आहे.
वाहन चालक, मालकांनी घ्यावी काळजी...
वाहन चालकाकडे परवाना गरजेचा आहे. शिवाय, आपण जे वाहन चालवित आहोत, त्या वाहनांचे फिटनेस, विमा, पीयुसी आदींबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. अनेकदा वाहनमालक विमा काढण्यासाठी चालढकल करतात, पण ते कधीही अंगलट येऊ शकते. त्यासाठी वाहतूक नियमांसह, मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन होणार नाही, यासाठी सजग राहणे गरजेचे आहे.
सुरक्षेसाठी विमा आवश्यक...
विमा नसताना वाहन चालवू नये. कोणतीही दुर्घटना, प्रसंग सांगून येत नाही. वाहन चालवित असताना एखादा पादचारी अचानक समोर येतो. वाहन स्लीप झाल्याने आपल्यालाच मार लागतो, वाहनांचे नुकसान होते. सुरक्षेसाठी वाहनांचा विमा महत्वाचा आहे. त्यामुळे वाहनांचा विमा, पीयुसी दरवर्षी न चुकता काढावी. लातूरच्या परिवहन विभागाने एप्रिल २३ ते मार्च २०२४ या कालावधीत तपासणी केलेल्या वाहनांत विमा नसलेल्याकडून १८ लाख ६५ हजारांचा दंड वसूल केला आहे.
- विनोद चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, लातूर.