शासकीय कर्मचारी असल्याचे सांगत स्टेट बँकेलाच ३५ लाखाला फसविले
By राजकुमार जोंधळे | Published: March 21, 2024 03:02 PM2024-03-21T15:02:15+5:302024-03-21T15:02:38+5:30
नागपूरच्या व्यवस्थापकाची न्यायालयात धाव; या प्रकरणी चाैघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
लातूर : शासकीय कर्मचारी असलयाचे भासवून बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतीय स्टेट बँकेची तब्बल ३५ लाख रुपयांना फसवणूक केल्याची घटना घडली. याप्रकरणात न्यायालयात नागपूर येथील भारतीय स्टेट बँकेच्या व्यवस्थापकाने धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानुसार शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पाेलिसांनी सांगितले, लातुरातील अमित तानाजी पाटील, शाम वंजारी, शंकर महादेव खडके आणि सचिन नागनाथ ढाेबळे यांनी आपण शासकीय कर्मचारी आहाेत, असे सांगत औसा राेडवरील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेतून प्रथम २२ लाख ६० हजारांचे कर्ज घेतले. त्यानंतर १२ लाख ५० हजारांचे असे एकूण ३५ लाख १० हजारांचे कर्ज घेतले. दरम्यान, कालांतराने त्यांच्याकडून कर्जाची परतफेड थांबली. याबाबत सतत नाेटीस बजावूनही कर्जाची परतफेड हाेत नसल्याने बॅकने अधिक चाैकशी केली असता, चार जणही कर्जदार हे शासकीय कर्मचारी नसल्याचे समाेर आले. त्यांच्या कर्जाची कागदपत्रे तपासण्यात आली असता, त्यात बनावट कागदपत्रे आढळली. हा प्रकार २०१९ ते २०२२ या काळात घडल्याचे तपासातून समाेर आले.
याची माहिती मिळताच नागपूर येथील भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापक अभिषेक मनाेजकुमार चटर्जी (वय ३५, रा. नागपूर) यांनी लातूरच्या न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. याबाबत शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात चाैघांविराेधात गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती पाेलिस निरीक्षक दिलीप सागर यांनी दिली. तपास पाेलिस उपनिरीक्षक पाटील करत आहेत.