प्रोत्साहन अनुदानाचे ३६९ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर !
By संदीप शिंदे | Published: March 16, 2023 05:57 PM2023-03-16T17:57:53+5:302023-03-16T17:58:07+5:30
१ लाख १३ हजार लाभार्थी, ४२५७ जणांची ई-केवायसी रखडली
लातूर : महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतंर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांपर्यंत प्रोत्साहन अनुदान देण्यात येत आहे. जिल्ह्यात १ लाख ८५ हजार ७४ लाभार्थी असून, यातील १ लाख १३ हजार २०२ लाभार्थ्यांच्या खात्यावर ३६९ कोटी ११ लाखांचे अनुदान वर्ग करण्यात आले आहे. तर ई-केवायसी केली नसल्याने ४२५७ शेतकरी प्रोत्साहनच्या लाभापासून वंचित आहेत.
तीन वर्षे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार जिल्ह्यात १ लाख ८५ हजार ७४ लाभार्थी आहेत. यातील १ लाख ३१ हजार ८३० शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक मिळालेला असून, १ लाख २७ हजार ५७३ शेतकऱ्यांनी आधार ई-केवायसी केली आहे. तर ४ हजार २५७ जणांनी ई-केवायसीकडे पाठ फिरविली आहे. पहिल्या यादीत ४८ हजार, दुसऱ्या यादीत ८३ हजार शेतकऱ्यांची नावे आली आहेत. तर तिसरी यादी जाहीर होणार आहे. दरम्यान, आतापर्यंत प्रोत्साहनपर अनुदानाबाबत ७७२ शेतकऱ्यांनी तक्रारी दाखल केल्या असून, जिल्हास्तरावर २९९ तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत. तसचे तहसीलस्तरावर ३११ तक्रारी सोडविण्यात आल्या असून, ८१ तक्रारी रखडलेल्या आहेत. महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेतंर्गत २ लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्यात आले होते. मात्र, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कोणतीही मदत देण्यात आली नव्हती. त्यामुळे शासनाने नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचे जाहीर केले होते. आता तिसरी यादी जाहीर होणार असून, सर्व प्रक्रिया विशिष्ठ क्रमांकावर सुरु असल्याचे जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून सांगण्यात आले.
ई-केवायसी तातडीने करुन घ्यावी...
लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रोत्साहन अनुदान जमा होण्यासाठी ई-केवायसी आवश्यक आहे. आतापर्यंत १ लाख २७ हजार ५७३ जणांनी ई-केवायसी केली असून, ४ हजार २५७ शेतकऱ्यांनी अद्यापही केवायसी केलेली नाही. त्यामुळे योजनेच्या लाभापासून ते वंचित आहेत. ई-केवायसी केल्यास प्रोत्साहन अनुदानाची रक्कम खात्यावर वर्ग करण्यास मदत होणार आहे. - एस.आर. नाईकवाडी, जिल्हा उपनिबंधक
सव्वा लाख जणांना विशिष्ट क्रमांक...
प्रोत्साहन अनुदानाची प्रक्रिया विशिष्ट क्रमांकावरच चालते. शेतकऱ्याचे नाव यादीत आल्यावर विशिष्ट क्रमांक दिला जातो. तो क्रमांक संबधित बँकेत दाखिवल्यावर प्रोत्साहनपोटी मिळणारी रक्कम दर्शविली जाते. त्याबद्दल शेतकऱ्याची तक्रार नसल्यास ही रक्कम खात्यावर वर्ग करण्यात येते. जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ३१ हजार ८३० जणांना विशिष्ट क्रमांक मिळालेला आहे.
प्रोत्साहन अनुदानाची अशी आहे आकडेवारी...
एकूण लाभार्थी - १,८५,०७४
विशिष्ट क्रमांक मिळालेले - १,३१,८३०
ई-केवायसी झालेले - १,२७,५७३
ई-केवायसी रखडलेले - ४,२५७
अनुदान मिळालेले - १,१३,२०२
अनुदानपोटी रक्कम - ३६९.११ कोटी