लातूर जिल्ह्यातील ५०३ गावांतील टंचाई निवारणासाठी ४ कोटींचा कृती आराखडा !
By संदीप शिंदे | Published: February 21, 2023 07:29 PM2023-02-21T19:29:54+5:302023-02-21T19:30:22+5:30
प्रस्तावित उपाययोजना : अधिग्रहणावर होणार सर्वाधिक खर्च
लातूर : फेब्रुवारी महिन्यातच उन्हाचा पारा वाढत चालला आहे. नदी, नाले कोरेडे पडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने संभावित पाणीटंचाई लक्षात घेऊन कृती आराखडा तयार केला आहे. यात जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जुन या दोन टप्प्यात आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील ३८४ गावे व ११० वाड्यांना मिळून एकूण ५०३ गाव-तांड्यावर पाणीपुरवठ्यासाठी ४ कोटी १६ लाख ३५ हजार रुपये विविध उपाययाेजनांसाठी खर्च करण्यात येणार आहेत.. या आराखड्यात सर्वाधिक १ कोटी ७७ लाख ७० हजार रुपयांचा खर्च हा खासगी विहीरी व विंधन विहीरीच्या अधिग्रहणासाठी करण्यात येणार आहे. दरवर्षी उन्हाळ्यात काही गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागतात. त्यावर उपाय म्हणून हा आराखडा तयार करण्यात आला आहे. दरम्यान, मागील दोन वर्षांपासून समाधानकारक पाऊस होत असल्याने टँकरची आवश्यकता भासली नाही. यावर्षीही तशी शक्यता नाही. मात्र, प्रशासनाकडून खबरदारी म्हणून टंचाई कृती आराखडा तयार केला आहे. यामध्ये जानेवारी ते मार्च या कालावधीत ७४ गावे, २९ वाड्यांवर विविध उपाययोजनांसाठी १ कोटी ९४ लाख ७८ हजार रुपये खर्च होणार आहेत. तर एप्रिल ते जून यादरम्यान ३१० गावे, ८१ वाड्या मिळून एकूण ४०० गाव-वाड्यांवर पाणी टंचाई निर्माण झाल्यास २ कोटी २१ लाख ५७ हजार रुपये खर्च केले जाणार आहेत.
अधिग्रहणासाठी पावणेदोन कोटी...
संभावित टंचाई कृती आराखड्यात सर्वाधिक १ कोटी ७७ लाख ७० हजार रुपये अधिग्रहणावर खर्च करण्यात येणार आहे. याशिवाय टँकरने पाणीपुरवठा करणे, विंधन विहीरी घेणे, नळ योजनांची विशेष दुरुस्ती, विंधन विहीरीची तात्पुरती दुरुस्ती, पुरक नळ योजना करणे, प्रगतीपथावरील नळ योजना पुर्ण करणे, विहीरीची खोली वाढविणे, गाळ काढणे, बुडक्या घेणे आदी विविध उपाययोजनांवर निधी खर्च केला जाणार आहे.
दोन टप्प्यात होणार अंमलबजावणी...
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने पाणीटंचाई निवारणार्थ कृती आराखडा तयार केला असून, यावर जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून या दोन टप्प्यात पाणी टंचाई निर्माण झाल्यास अंमलबजावणी करण्यात येणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात विविध उपाययोजनेतंर्गत नळ योजनेच्या विशेष दुरुस्तीसाठी १ कोटी ६ लाख, टॅकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी २५ लाख २० हजार रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे.