बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजून काढला ४० एकर शेती परिसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2020 10:15 AM2020-05-05T10:15:08+5:302020-05-05T10:17:32+5:30

लातूर तालुक्यातील बाभळगाव, भुसनी परिसरात रविवारी सकाळी ६.३० वा. च्या सुमारास ये- जा करणाऱ्या काही जणांना बिबट्याचे दर्शन घडल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली.

40 acres of farmland cleared for leopard search operation | बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजून काढला ४० एकर शेती परिसर

बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजून काढला ४० एकर शेती परिसर

googlenewsNext
ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या शेतात दोन दिवसांपासून शोध मोहीम

लातूर : लातूर शहराजवळील बाभळगाव येथे  पालकमंत्री अमित देशमुख यांच्या ऊस शेतीत रविवारी सकाळी बिबट्याचे ठसे आढळून आले. त्याला जेरबंद करण्यासाठी वन विभागाकडून दोन दिवसापासून शोध मोहीम राबविण्यात येत आहे. मंगळवारी पहाटे ५ वा. पासून ते सकाळी ८ वा. पर्यंत स्थानिक नागरिक, वन्य प्रेमींच्या मदतीने जवळपास ४० एकरचा शेती परिसर पिंजून काढण्यात आला. मात्र, बिबट्या अथवा त्याच्या पाऊल खुणा आढळून आल्या नाहीत.

लातूर तालुक्यातील बाभळगाव, भुसनी परिसरात रविवारी सकाळी ६.३० वा. च्या सुमारास ये- जा करणाऱ्या  काही जणांना बिबट्याचे दर्शन घडल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली. त्यावरून तालुका वन परिमंडळ अधिकारी एन.एस. पचरंडे यांच्यासह २० कर्मचारी दाखल झाले. त्यांनी शोध घेण्यास सुरुवात केली असता पालकमंत्री अमित देशमुख यांच्या उसाच्या शेतात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले. त्यास जेरबंद करण्यासाठी ऊसशेती परिसरात दोन तर बांबू शेतीजवळ एक पिंजरा लावला. 
विभागीय वन अधिकारी एम.आर. गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली लातूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी  सी.जी. पोतुलवार, एन.एस. पचरंडे यांनी ड्रोन, ट्रॅप कॅमेऱ्याच्या साह्याने शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र त्यात बिबट्या आढळून आला नाही. सोमवारी ट्रॅप कॅमेरे आणखीन वाढवून शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र त्यातही बिबट्याचा वावर आढळून आला नाही.

मंगळवारी पहाटे ५ वा. वन विभागाचे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्थानिक नागरिक व वन्य प्रेमींच्या मदतीने ऊसशेतीसह जवळपास ४० एकराचा परिसर सकाळी ८ वा. पर्यंत पिंजून काढला. मात्र त्यांना बिबट्या अथवा त्याच्या पाउल खुणा आढळून आल्या नाहीत. तसेच ठेवलेले खाद्यही तिथेच होते.


नागरिकांनी घाबरू नये गस्त सुरूच...
उसाचा जवळपास दहा ते बारा एकराचा फड आणि परिसरातील शेती मंगळवारी सकाळपर्यंत पिंजून काढली. मात्र बिबट्या आढळून आला नाही. तसेच पिंजऱ्यातील खाद्य तिथेच आहे. याशिवाय परिसरातील कुठल्याही पाळीव प्राण्यावर हल्ला झाल्याचे दिसून आले नाही. आमची सतत गस्त सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन तालुका वन परिमंडळ अधिकारी एन. एस. पचरंडे यांनी केले आहे.

दक्षतेसाठी ट्रॅप कॅमेरे तिथेच...
गेल्या ४८ तासांपासून शोध मोहीम सुरू आहे. दक्षता म्हणून ट्रॅप कॅमेरे आणखीन काही दिवस येथेच ठेवले जाणार आहेत. बाभाळगावसह भुसनी व परिसरातील गावांमध्ये गस्त सुरु आहे. नागरिकांनी घाबरू नये. काळजी घ्यावी, असेही पचरंडे म्हणाले.

Web Title: 40 acres of farmland cleared for leopard search operation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.