लातूरात ४० मुख्याध्यापकांना मिळाली बढती; केंद्रप्रमुख पदाची अपेक्षापूर्ती झाल्याने आनंदोत्सव
By हरी मोकाशे | Published: March 7, 2024 07:36 PM2024-03-07T19:36:47+5:302024-03-07T19:37:09+5:30
जिल्हा परिषद शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी जिल्ह्यात एकूण १०२ केंद्र आहेत. त्यापैकी ५० टक्के पदे ही सेवाज्येष्ठतेनुसार भरावीत, असे शासनाचे आदेश आहेत.
लातूर : जिल्हा परिषद शाळांतील ज्येष्ठ मुख्याध्यापकांना केंद्रप्रमुखपदी पदोन्नतीचे वेध काही वर्षांपासून लागून होते. अखेर गुरुवारी पदोन्नतीची प्रक्रिया होऊन ४० मुख्याध्यापकांची केंद्रप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या नूतन केंद्र प्रमुखांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.
जिल्हा परिषद शाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी जिल्ह्यात एकूण १०२ केंद्र आहेत. त्यापैकी ५० टक्के पदे ही सेवाज्येष्ठतेनुसार भरावीत, असे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार गुरुवारी पदोन्नतीची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर स्थायी समिती सभागृहात पार पडली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, सामान्य प्रशासनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, उपशिक्षणाधिकारी प्रमोद पवार, बाबासाहेब पवार यांच्यासह कक्ष अधिकारी गिरी आदी उपस्थित होते.
तालुका - पदोन्नती
लातूर - ४
औसा - ७
रेणापूर - २
निलंगा - ४
उदगीर - ३
अहमदपूर - ७
चाकूर - ५
देवणी - २
जळकोट - ३
शिरुर अनं. - ३
एकूण - ४०
६४ मुख्याध्यापकांना पदोन्नतीसाठी बोलविले...
जिल्हा परिषदेत केंद्र प्रमुखांची एकूण १०२ पदे आहेत. त्यातील ५० टक्के पदे ही सेवाज्येष्ठतेनुसार तर उर्वरित ५० टक्के पदे सरळ सेवेद्वारे भरण्याचे शासनाचे आदेश आहेत. दरम्यान, १०२ पैकी ११ ठिकाणी केंद्रप्रमुख असल्याने उर्वरित ४० मुख्याध्यापकांना पदोन्नती देण्यासाठी सेवाज्येष्ठतेनुसार ६४ मुख्याध्यापकांना बोलाविण्यात आले हाेते. त्यापैकी ४० जणांना पदोन्नती देण्यात आली.
सहा मुख्याध्यापकांनी नाकारली पदोन्नती...
४० जागांच्या पदोन्नतीसाठी ६४ मुख्याध्यापकांना बोलाविण्यात आले असले तरी त्यापैकी ४६ जणांना संधी मिळाली. त्यातील सहा जणांनी आपली वैयक्तिक अडचणी सांगून पदोन्नती नाकारली. आपण मुख्याध्यापक म्हणून काम करण्यात समाधानी असल्याचे सांगितले.
१० वर्षांनंतर पार पडली बढती प्रक्रिया...
जिल्हा परिषदेत सन २०१४ मध्ये सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापकांना बढती देण्यात आली होती. त्यानंतर मात्र, सातत्याने विविध अडचणी निर्माण होत होत्या. परिणामी, पदोन्नतीची प्रक्रिया रखडली होती. लवकरात लवकर पदोन्नती देण्यात यावी, अशी सातत्याने मागणी होत होती.
गुणवत्ता वाढीसाठी मदत होणार...
सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापकांना केंद्रप्रमुखपदी पदोन्नती देण्याची प्रक्रिया विविध अडचणींमुळे रखडली होती. आता ही प्रक्रिया पार पडली आहे. केंद्रप्रमुखांच्या नियुक्तीमुळे त्याअंतर्गतच्या शाळांची नियमित पाहणी करण्याबरोबर तपासण्या केल्या जाणार आहेत. शिवाय, गुणवत्ता वाढीसाठी विशेष लक्ष दिले जाणार आहे.
- वंदना फुटाणे, शिक्षणाधिकारी.
मुख्याध्यापकांची एकमेकांकडे चौकशी...
पदोन्नती प्रक्रियेमुळे जिल्हा परिषदेत मुख्याध्यापकांनी मोठी गर्दी केली होती. समुपदेशन पध्दतीने पदोन्नती प्रक्रिया पार पडल्यानंतर मुख्याध्यापक एकमेकांशी संवाद साधून नवे केंद्र आपल्याला किती जवळचे आहे, त्यासाठी कोणता चांगला, जवळचा मार्ग आहे, यासंदर्भात चर्चा करीत होते.