लातूर जिल्हा परिषदेतील ४५० कर्मचाऱ्यांना मिळणार वरिष्ठ वेतनाचा लाभ; दिवाळी झाली गोड!
By हरी मोकाशे | Published: November 22, 2023 06:49 PM2023-11-22T18:49:04+5:302023-11-22T18:50:06+5:30
आश्वासित प्रगती योजनेमुळे होणार वेतनात वाढ
लातूर : दहा वर्षांचा कालावधी उलटूनही पदोन्नती न झाल्याने पात्र कर्मचाऱ्यांचे आश्वासित प्रगती योजनेकडे लक्ष लागून होते. दीपावलीच्या कालावधीत जिल्हा परिषदेने आवश्यक ती कार्यवाही जलद गतीने करीत प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे ४५० कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पदाच्या वेतनश्रेणीचा लाभ मिळणार आहे. परिणामी, या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असून दिवाळी आनंदात गोड झाली आहे.
राज्य शासनाच्या निर्णयानुसार जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना सुधारित सेवाअंतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यास त्याच्या सलग सेवेच्या १०, २० आणि ३० वर्षानंतर तीन लाभ अनुज्ञेय आहेत. दरम्यान, पदोन्नती न झालेल्या पात्र कर्मचाऱ्यांचे आश्वासित प्रगती योजनेकडे लक्ष लागून होते. विभागाअंतर्गत बढती न झाली तरी चालेल मात्र वरिष्ठ वेतन श्रेणीचा लाभ मिळावा म्हणून सातत्याने चौकशी करण्यात येत होती. ही बाब जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमाेल सागर यांच्या निदर्शनास आली. त्यामुळे त्यांनी दीपावलीच्या कालावधीत यासंदर्भातील आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागास केल्या. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ यांनी विनाविलंब प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे दीपावलीच्या कालावधीत ४५० कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. या कर्मचाऱ्यांना वरिष्ठ पद वेतनश्रेणीचा लाभ मिळणार आहे.
बांधकाम विभागास सर्वाधिक लाभ...
सहाय्यक प्रशासन अधिकारी - १
लघुलेखक - १
विस्तार अधिकारी सां. - १
वरिष्ठ सहाय्यक - ४
कनिष्ठ सहाय्यक - १४
परिचर - ६३
कृषी अधिकारी - १
विस्तार अधिकारी कृषी - २
सहा. पशुधन वि.अ. - ७
प. पर्यवेक्षक - ८
शाखा अभियंता - ४७
स्थापत्य अभि. सहा. - १
प्रमुख आरेखक - २
आरेखक - २
कनिष्ठ आरेखक - ४
मैल कामगार - ११३
वाहन चालक - २
मिस्त्री - १९
औषध निर्माण अधिकारी - ४
आरोग्य पर्यवेक्षक - १
आरोग्य सेवक पु. - १३
आरोग्य सहा. पु. - ७
आरोग्य सेवक म. - १६
आरोग्य सहा. म. - ४
विस्तार अधिकारी पं. - १
ग्रामविकास अधिकारी - ६
ग्रामसेवक - १७
पर्यवेक्षका - ५७
कनिष्ठ अभियंता - ३२
एकूण - ४५०
योजनेच्या लाभामुळे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन...
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना आस्थापनाविषयक अनुज्ञेय असलेले सर्व लाभ वेळीच मंजूर करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन नेहमीच प्रयत्नशील आहे. आश्वासित प्रगती योजनेचा ४५० कर्मचाऱ्यांना लाभ मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल आणि ते आणखीन हिरीरीने जिल्हा परिषदेच्या दैनंदिन कामकाजात सहभागी होऊन लवकरात पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील.
- अनमोल सागर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद.
कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यावर भर...
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे लाभाचे सर्व सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहे. सीईओंच्या मार्गदर्शनाखाली आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित असलेला कर्मचाऱ्यांचा निकाली निघाला आहे. या कर्मचाऱ्यांच्या वेतनात लवकरच वाढ होणार आहे.
- नितीन दाताळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन.