जिल्ह्यातील 45 हजार रूग्णांनी कोरोनाला हरवून दाखवले !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:19 AM2021-04-25T04:19:21+5:302021-04-25T04:19:21+5:30
लातूर : काेरोनाच्या संसर्गामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण असले तरी तब्बल ४५ हजार ७३५ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. ...
लातूर : काेरोनाच्या संसर्गामुळे जिल्ह्यात भीतीचे वातावरण असले तरी तब्बल ४५ हजार ७३५ जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. घाबरू नका, कोरोना काही करू शकत नाही. लक्षणे दिसताच तपासणी करून उपचार घ्या, असा सल्ला कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांनी दिला आहे.
आरटीपीसीआर आणि रॅपिड टेस्ट मिळून जिल्ह्यात ४ लाख १ हजार ८५४ जणांनी चाचणी केली. त्यात ३ लाख ३६ हजार लोकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. फक्त ६२ हजार ६०६ जणांचा अहवाल पाॅझिटिव्ह आला. यातील तब्बल ४५ हजार ७३५ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यांचे दैनंदिन जीवन पद्धती सुरळीत झाली आहे. त्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. यातील काही जणांशी संवाद साधला असता कोरोनाला भिऊ नका, लक्षणे दिसताच डाॅक्टरांकडे जावून तपासणी करून घेणे महत्त्वाचे आहे. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतल्यास पाच ते सहा दिवसात प्रकृती पूर्वपदावर येते. त्यामुळे भीतीचे कारण नाही. अंगावर घालणे चुकीचे आहे. औषधोपचार वेळेत घेतल्यास कोरोना तुमचे काही बिघडवू शकत नाही. आम्ही त्याला हरविले आता तुम्हीही त्याला हरवू शकता, असे आवाहनही कोरोनामुक्त झालेल्यांनी केले आहे.
शासनाने आखून दिलेले नियम पाळले तर मुळात कोरोनाच होणार नाही. परंतु, चुका होतात. आमच्याकडूनही झाली होती. त्यामुळेच त्याने आम्हाला घेरले. परंतु, मी घाबरलो नाही. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतला. पाच ते सहा दिवसांत प्रकृती पूर्वपदावर आली. ती येतेच. फक्त घाबरू नये. - सुधाकर सावंत,
कोरोनामुक्त रूग्ण, लातूर
कोरोनाला हरवू शकतो. मात्र लक्षणे दिसताच चाचणी करून औषध उपचार वेळेवर घ्यावा. लागण झाली तरी घाबरू नये. सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. मी वेळेत औषधोपचार घेतल्याने कोरोनाला हरविले. काळजी घ्या. घाबरू नका. शासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करावे. - साबेर काझी, कोरोनामुक्त रूग्ण, लातूर
त्रास हाेतो. जेवण जात नाही. वास आणि चवही येत नाही. यावर सहज मात करता येते. घाबरू नये मन घट्ट करावे तेच मी केले. घरच्यांची साथ होती. डाॅक्टरांनी उपचार करून धीर दिला. त्यामुळे कोरोनाला मी सहज हरविले, तुम्हीही हरवू शकता. - शांताबाई झुंजे, कोरोनामुक्त रूग्ण.