जिल्ह्यात पहिलीच्या वर्गातील ४६ हजारांवर बालके गेली पुढच्या वर्गात; सवंगड्यांचा सहवास दुरावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:21 AM2021-04-23T04:21:05+5:302021-04-23T04:21:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क लातूर : इयत्ता पहिलीच्या वर्गात पडलेले पाऊल म्हणजे शालेय जीवनाची सुरुवात होय. याच वर्गात बोबड्या बोलात ...
लोकमत न्यूज नेटवर्क
लातूर : इयत्ता पहिलीच्या वर्गात पडलेले पाऊल म्हणजे शालेय जीवनाची सुरुवात होय. याच वर्गात बोबड्या बोलात ‘बाराखडी’ आणि सवंगड्यांसोबत बालगीतांचा सूर आवळला जातो. सरत्या शैक्षणिक वर्षात कोरोनाने शाळेत प्रवेशित झालेल्या पहिलीच्या चिमुरड्यांसाठी शाळेची घंटा वाजलीच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ४६ हजार ७७८ मुले दुसऱ्या वर्गात गेली आहेत.
वाचन-लेखन या क्षमता मिळविण्यासाठी नव्हे, तर जीवनातील प्रत्येक कसोटीवर आपला ठसा उमटविण्यासाठी गरजेचे असलेले ज्ञानार्जन शिक्षणाच्या माध्यमातून मिळते. जिल्ह्यात पहिलीच्या वर्गात ४६ हजार ७७८, दुसरी ४६ हजार ७३३, तिसरी ५६ हजार ६३१, चौथी ४७ हजार ६९९, पाचवी ४९ हजार २१५, सहावी ४८ हजार ४८८, सातवी ४९ हजार ४६७ तर आठवीच्या वर्गात ४९ हजार २९३ विद्यार्थी संख्या आहे. पहिली ते आठवी आणि नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेताच पुढच्या वर्गात प्रवेश मिळणार आहे. दरम्यान, पहिलीच्या वर्गातील मुलांचे प्रवेश झाले आणि त्यानंतर कोरोनाचे सावट पसरले. त्यामुळे पालकांत भीतीचे वातावरण आजही आहे.
पहिलीच्या वर्गातील मुलांनी तर ना शाळेच्या भिंती पाहिल्या, ना शिक्षकांचा चेहरा. लहान बालके श्रवण व अनुकरण यातून लहानपणापासून शिकत असतात. शालेय जीवनाचा पाया भक्कम करण्यासाठी पहिली ते चौथी वर्गात विद्यार्थ्यांचा पूर्णपणे अभ्यास करून घेतला जातो. मात्र कोरोनाच्या संकटामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. विविध शाळांच्या वतीने ऑनलाईन अभ्यासक्रम राबविला जात आहे. विद्यार्थीही त्याला उपस्थित राहत आहेत. मात्र प्रत्यक्ष शाळेतील सवंगड्यांसोबतचा अध्ययन करण्याची संधी यावर्षी तरी गमवावी लागली आहे.
जिल्ह्यात पहिलीच्या वर्गाचे ४६ हजार ७७८ विद्यार्थी आहेत. यामध्ये २२ हजार २५८ मुली, तर २४ हजार ५२० मुलांची संख्या आहे. पहिलीच्या वर्गात प्रवेश झाल्यापासून शाळा बंद असल्याने अनेक पालक आपल्या चिमुकल्यांचा घरीच अभ्यास घेत आहेत. विशेष म्हणजे शिक्षकांची ओळख न होता ही बालके पुढील वर्गात दाखल झाली आहेत.
पहिलीच्या वर्गाला शालेय जीवनात महत्व
इयत्ता पहिलीच्या वर्गाला शालेय जीवनात महत्व आहे. सारे गाऊ या, अक्षर ओळख, वाचन पाठ, शब्दखेळ यातून अध्ययन, निश्चिती केली जाते. गोष्ट, कविता, गाणी, चित्रवाचन, अक्षर गट, कृती यावरून शिक्षणाची गोडी निर्माण केली जाते.
पाहा, ऐका व बोला या त्रिसूत्रीवर अधिक भर दिला जातो. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळाच बंद असल्याने पहिलीची मुले अभ्यासापासून वंचित राहिली आहेत.