४९ हजार शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात प्रोत्साहनपर अनुदान, युनिक नंबर बँकेत दाखवावा लागणार
By संदीप शिंदे | Published: October 12, 2022 06:30 PM2022-10-12T18:30:08+5:302022-10-12T18:30:33+5:30
२०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या तीन आर्थिक वर्षांपैकी दोन वर्षे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
लातूर : महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या ४९ हजार शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्पात प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. उर्वरित शेतकऱ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात याेजनेचा लाभ शासनाच्या वतीने देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक एस.आर. नाईकवाडी यांनी बुधवारी पत्रपरिषदेत दिली.
२०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या तीन आर्थिक वर्षांपैकी दोन वर्षे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार अध्यादेश निर्गिमित करण्यात आला. सर्वच बँकांनी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या याद्या पोर्टलवर अपलोड केल्या आहेत. त्यानुसार पहिली यादी बुधवारी रात्री प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यामध्ये ४९ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांना दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात लाभ मिळणार असून, यादीतील शेतकऱ्यांना विशिष्ट क्रमांक दिला जाणार आहे. हा क्रमांक संबधित बँकेत देऊन आधार पडताळणी व कर्ज रकमेची खात्री करावी लागणार आहे. शेतकऱ्यांची संमती आल्यावर प्रोत्साहनपर अनुदान बचत खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचेही उपनिबंधक एस.आर. नाईकवाडी यांनी सांगितले. पत्रपरिषदेस सहायक निबंधक उमेश पवार, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनंत कसबे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जनरल मॅनेजर सी.एन. उगिले, नोडल ऑफीसर विजय हरिदास यांची उपस्थिती होती.
तक्रार निवारणासाठी समिती गठीत...
विशिष्ट क्रमांक मिळाल्यावर बँकेत जाऊन कर्जाची रक्कम व आधार क्रमांक पडताळणी करण्यात येणार आहे. त्यामध्ये पात्र लाभार्थ्यांच्या संमतीनंतरच अनुदान खात्यावर वर्ग होईल. दरम्यान, कर्ज रकमेत तफावत असल्यास संबधित शेतकऱ्यांस तालुकास्तरावर तहसीलदार तर जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार करता येणार आहे.
जिल्हा बँकेचे १ लाख ६३ हजार लाभार्थी...
प्रोत्साहनपर अनुदानासाठी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे १ लाख ६३ हजार लाभार्थी पात्र ठरलेले आहेत. तीन ते चार टप्प्यात या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. राष्ट्रीयीकृत बँकानीही त्यांच्याकडील पात्र शेतकऱ्यांची नावे शासनाच्या पोर्टलवर कळविली आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात सर्वच बँका मिळून ४९ हजार शेतकऱ्यांची यादी जाहीर होत आहे.
जिल्ह्याला मिळणार ४०० कोटी रुपये...
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येत आहे. यामध्ये २०१८ ते २०२० या आर्थिक वर्षांचा समावेश आहे. दरम्यान जिल्हा बँकेचे १ लाख ६३ हजार पात्र शेतकरी आहेत. तर राष्ट्रीयीकृत बँकेच्या पात्र शेतकऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. सर्वच टप्पे मिळून ३५० ते ४०० कोटी रुपये प्रोत्साहनपर अनुदानासाठी जिल्ह्याला मिळणार आहे.