'राष्ट्रीय आरोग्य अभियान'मध्ये लातूर राज्यात चतुर्थ

By हरी मोकाशे | Published: November 25, 2023 05:46 PM2023-11-25T17:46:52+5:302023-11-25T17:47:14+5:30

जिल्हा आरोग्य विभाग, शल्यचिकित्सक कार्यालय समान स्थानी

4th in Latur State in 'National Health Mission' | 'राष्ट्रीय आरोग्य अभियान'मध्ये लातूर राज्यात चतुर्थ

'राष्ट्रीय आरोग्य अभियान'मध्ये लातूर राज्यात चतुर्थ

लातूर : राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्ह्यात देण्यात येणाऱ्या सेवा- सुविधांचे दर महिन्यास राज्यस्तरावर मुल्यमापन करण्यात येते. जुलैमधील मुल्यांकनाचा अहवाल प्राप्त झाला असून त्यात जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय राज्यात चतुर्थ आले आहेत. जिल्ह्यातील दोन्ही आरोग्य विभागांना समान स्थान मिळाले आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानअंतर्गत माता व बाल आरोग्य कार्यक्रम व कुटुंब कल्याण कार्यक्रम, नियमित लसीकरण, राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य, राष्ट्रीय बालस्वास्थ्य, राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन, राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम, एनपीसीडीसीएस असे विविध उपक्रम राबविले जातात. या उपक्रमांच्या माध्यमातून रुग्णांसह, गरजूंना आरोग्यसेवा पुरविली जाते. यातील कोणत्या सेवा अधिकाधिक देण्यात आल्या. तसेच सुविधांचा रुग्णांना लाभ मिळाला का याची राज्यस्तरावर दर महिन्यास तपासणी केली जाते. त्यात रुग्णालय, आरोग्य वर्धिनी, रुग्ण कल्याण समितीचे कार्याचेही मुल्यांकन करण्यात येते. राज्यस्तरावर दर महिन्यास मुल्यांकन करुन रँकिंग दिली जाते. जुलै महिन्याचा रँकिंग अहवाल प्राप्त झाला असून त्यात लातूरचा आरोग्य विभाग राज्यात चौथ्या स्थानावर आहे.

जिल्हा आरोग्य विभागास ३५.६३ गुण...
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमातील दर्शकांवर आधारित रँकिंगमध्ये जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग राज्यात चौथ्या स्थानावर आहे. ३५.७३ गुण मिळाले आहेत. विशेषत: धाराशिव जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग प्रथम स्थानावर असून ४३.६९ तर द्वितीय स्थानावर बीड असून ३५.९७ गुण मिळाले आहेत. पहिल्या पाचमध्ये मराठवाड्यातील तीन जिल्हे आहेत.

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयास ३९ गुण...
याच अभियानात लातूरचे जिल्हा शल्यचिकित्सक राज्यात चतुर्थ असून ३९ असे गुण आहेत. तृतीय स्थानावर धाराशिवचे जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय असून ४०.४७ असे गुण आहेत. पहिल्या पाचमध्ये मराठवाड्यातील केवळ दोन जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय आहेत.

अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पाठपुराव्याने यश...
राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत विविध कामांचे एकत्रितपणे गुणांकन करण्यात येते. क्षेत्रीय पातळीवरील कर्मचाऱ्यांपासून ते जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे पहिल्या पाच क्रमांकामध्ये जिल्हा आरोग्य विभाग आला आहे. त्यामुळे आम्हा सर्वांवर आणखीन जबाबदारी वाढली आहे. अधिकाधिक आरोग्य सेवा देण्याचा प्रयत्न राहणार आहे.
- डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

गुणवत्ता कायम राखण्याचा प्रयत्न...
शासकीय रुग्णालयाच्या माध्यमातून गाेरगरिब रुग्णांना दर्जेदार आरोग्य सेवा देण्याचा सातत्याने प्रयत्न आहे. त्यामुळे राज्यात चौथा क्रमांक मिळाला आहे. गुणवत्ता कायम राखण्याबरोबरच अधिक सेवा- सुविधा देण्यासाठी आमचा कसोशीने प्रयत्न राहणार आहे.
- डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा शल्यचिकित्सक.

Web Title: 4th in Latur State in 'National Health Mission'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.