5 टक्के जीएसटी... लातूर शहरात व्यापारी महासंघाच्या बंदला प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 10:02 PM2022-07-16T22:02:10+5:302022-07-16T22:02:39+5:30
अन्नधान्य, खाद्य पदार्थांवरील ५ टक्के जीएसटी रद्द करा
लातूर : ४७ व्या जीएसटी काैन्सिलने प्रस्तावित केलेल्या अन्नधान्य व खाद्य पदार्थांवर ५ टक्के जीएसटी आकारणी करण्यात आली असून, ती रद्द करावी, अशी मागणी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत लातूर व्यापारी महासंघाने एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अन्नधान्यांवर ५ टक्के जीएसटी लावल्याच्या निषेधार्थ शनिवारी, १६ जुलै रोजी भारत बंद पुकारण्यात आला हाेता. दरम्यान, या बंदला लातूर शहरात व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून प्रतिसाद दिला.
बंदमध्ये लातूर व्यापारी महासंघ, लातूर किराणा व्यापारी असोसिएशन आणि लातूर दाल मिल असोसिएशन, चेंबर ऑफ कॉमर्स सहभागी झाले हाेते. अन्नधान्यांवर लावलेल्या करामुळे महागाईची तीव्रता वाढणार आहे. याचा भार सामान्य ग्राहक आणि शेतकऱ्यांवरही पडणार आहे. त्याचबराेबर छोट्या व्यापाऱ्यांना या कराची अंमलबजावणी करणे व त्याची पूर्तता करणे व्यवहार्य परवडणारे नाही. या करवाढीचा प्रत्यक्ष फायदा मोठे मॉल आणि ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना होणार आहे. असेही व्यापारी महासंघाने आपल्या निवेदनात म्हटले आहे.