लातूर जिल्ह्यातील ५ हजार जलस्त्रोतांचे होणार निर्जंतुकीकरण

By हरी मोकाशे | Published: July 14, 2023 05:56 PM2023-07-14T17:56:14+5:302023-07-14T17:57:01+5:30

जलजन्य आजार रोखण्यासाठी जिल्हा परिषदेची मोहीम

5 thousand water sources in Latur district will be disinfected | लातूर जिल्ह्यातील ५ हजार जलस्त्रोतांचे होणार निर्जंतुकीकरण

लातूर जिल्ह्यातील ५ हजार जलस्त्रोतांचे होणार निर्जंतुकीकरण

googlenewsNext

लातूर : पावसाळा सुरु झाला की जलसाठ्यात वाढ होते. त्यामुळे जलसाठ्याबरोबर जलस्त्रोताचे पाणी दूषित होण्याची शक्यता असते. त्यातून जलजन्य आजार उद्भवू शकतात. कुठल्याही जलजन्य आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व पंचायत वतीने जिल्ह्यात जलस्त्रोतांचे निर्जंतुकीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यात ५ हजार स्त्रोतांचे क्लोरिनवॉश करण्यात येणार आहे.

पावसाळा सुरु झाला की भूगर्भातील पाणीसाठा वाढतो. त्यामुळे हातपंप, विद्युतपंप, आड- विहिरींचे पाणी दूषित होण्याची सर्वाधिक शक्यता असते. ग्रामीण भागातील काही ठिकाणचे नागरिक या जलस्त्रोतांचे, जलसाठ्यांचे पाणी पितात. परिणामी, जलजन्य आजार उद्भवतात. तसेच जलजन्य आजारांचा उद्रेक होण्याची भीतीही असते. शिवाय, पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीस गळती, जलस्त्रोताच्या सभोवतालचा परिसर अस्वच्छ असणे, पाणी निर्जंतुकीकरणासाठी ब्लिचिंग पावडर उपलब्ध नसणे, उपलब्ध असल्यास त्याचा नियमित वापर न करणे, पाणीपुरवठा करणारा कर्मचारी, जलसुरक्षक प्रशिक्षित नसणे, हातपंप, विद्युत पंपांचे क्लोरिनवॉश न करणे, आड-विहिरींच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण न करणे अशा कारणांमुळे दूषित पाणीपुरवठा होतो. त्यामुळे जलजन्य आजार होतात. त्याच्या प्रतिबंधासाठी विद्युतपंप, हातपंपांचे क्लोरिनवॉश करणे तसेच आड- विहिरींच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्याची मोहीम १६ जे ३० जुलै दरम्यान जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून राबविण्यात येणार आहे.

उदगीरात पाण्याचे सर्वाधिक जलस्त्रोत...
अहमदपूर - ५५६
औसा - ५८८
चाकूर - ५५२
देवणी - २९६
जळकोट - ३१३
लातूर - ६४७
निलंगा - ६४३
रेणापूर - ५१०
शिरुर अनं. - ३०६
उदगीर - ७१६

दूषित पाण्याने हे होतात आजार...
दूषित पाणी पिल्यामुळे गॅस्ट्रो, कॉलरा, अतिसार, काविळ, विषमज्वर असे जलजन्य आजार उद्भवू शकतात. बहुतांश नागरिकांना पाण्यातून आजार होतात याची माहिती नसल्याने ते सहजरीत्या बोअर, आड, विहिरीचे पाणी पितात. त्याचा आरोग्यावर परिणाम होऊन विविध आजारांची लागण होण्याची भीती असते.

मोहिमेमुळे आजारास प्रतिबंध...
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये जलजन्य आजारांची भीती असते. त्यामुळे आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीच्या वतीने ही मोहीम राबवत आहोत. त्यातून जलस्त्रोतांचे निर्जंतुकीकरण होते. त्याचबरोबर गावातील नागरिकांनाही पाण्यातून होणाऱ्या आजारांबद्दल माहिती देऊन जनजागृती करण्यात येते. या मोहिमेमुळे मागील वर्षात जिल्ह्यात कुठेही जलजन्य आजाराचा उद्रेक झाला नाही.
- अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी.

जलजन्य आजार रोखण्यास मदत...
पाऊस झाला की जमिनीवरील घाण ही पाण्याबरोबर उताराच्या दिशेने वाहून जलसाठे अथवा जलस्त्रोताच्या ठिकाणी मुरते. त्यामुळे विहिरी, आडाचे, हातपंप, विद्युत पंपाचे पाणी दूषित होते. ते पाणी पिल्याने गॅस्ट्रो, कॉलरा, अतिसार, कावीळ असे आजार होतात. असे आजार उद्भवू नयेत म्हणून ही आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीच्या वतीने ही मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यामुळे जलजन्य आजार रोखण्यास मदत होते.
- डॉ. एच.व्ही. वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

विद्युत, हात पंपाचा सर्वाधिक वापर...
नळ पाणीपुरवठा विहीर - ७६२
हातपंप, विद्युतपंप - ३४३७
सार्वजनिक विहिरी - ९२८

Web Title: 5 thousand water sources in Latur district will be disinfected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.