३० रुपयांची उधारी मागितल्याने खून करणाऱ्या आरोपीस ५ वर्षे सश्रम कारावास
By राजकुमार जोंधळे | Updated: July 27, 2022 20:22 IST2022-07-27T20:21:11+5:302022-07-27T20:22:32+5:30
उदगीर येथील सत्र न्यायालयाचा निकाल

३० रुपयांची उधारी मागितल्याने खून करणाऱ्या आरोपीस ५ वर्षे सश्रम कारावास
उदगीर (जि. लातूर) : हॉटेलची ३० रुपयांची उधारी मागितल्याने आरोपीने एकास लोखंडी रॉडने मारून खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपीस उदगीरच्या सत्र न्यायालयाने पाच वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
पोलिसांनी सांगितले, १० फेब्रुवारी २००६ रोजी मयत अलीम महम्मद निसार जमादार याने आरोपी बालाजी मनोहर पाटील यास हॉटेलची ३० रुपयांची उधारी मागितली होती. तेव्हा आरोपीने माझी ३० रुपये एवढी किंमत नाही का असे म्हणत अलिम यांच्या डोक्यात, कपाळावर, हनवटीवर लोखंडी रॉडने मारून खून केला होता. याप्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात निसार वलीमहम्मद जमादार यांच्या फिर्यादीवरून आरोपीवर कलम ३०२ भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक एम. एम. राचटकर यांनी करून न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाची सुनावणी येथील सत्र न्यायालयाचे न्या. डी. पी. सातावळेकर यांच्यासमोर झाली. सुनावणीदरम्यान सरकार पक्षाच्यावतीने दाखल करण्यात आलेल्या साक्षी पुराव्याअधारे न्यायालयाने आरोपीस कलम पाच वर्षे सश्रम कारावास व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिन्यांची साधी कैद अशी शिक्षा सुनावली.
या प्रकरणात सरकार पक्षाच्यावतीने सहाय्यक शासकीय अभियोक्ता जी. सी. सय्यद यांनी काम पाहिले. त्यांना एस. आय. बिराजदार व एस. एम. गिरवलकर यांनी सहकार्य केले. कोर्ट पैरवी सय्यद शौकत उस्मान यांनी केली.