बस न आल्याने पहिल्याच दिवशी ५० विद्यार्थ्यांची शाळा बुडाली; एसटी महामंडळाचे उदासीन धोरण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2023 04:18 PM2023-06-16T16:18:26+5:302023-06-16T16:19:23+5:30
निलंगा तालुक्यातील शिवाजीराव पाटील विद्यालय अनसरवाडा येथे शाळेत येळणूर व गुंजरगा येथून सुमारे ५० ते ५२ विद्यार्थी ये-जा करतात.
निलंगा (लातूर) : उन्हाळ्याच्या प्रदीर्घ सुटीनंतर गुरुवारी शाळेचा पहिला दिवस. महाराष्ट्रातील सर्वच शाळेमध्ये विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मात्र, अनसरवाडा येथील शाळेतील विद्यार्थांची केवळ बस न आल्यामुळे पन्नास विद्यार्थ्यांची शाळा पहिल्याच दिवशी बुडाल्याने पालक व पाल्यांनी एसटी महामंडळाच्या विरुद्ध असंतोष व्यक्त केला.
निलंगा तालुक्यातील शिवाजीराव पाटील विद्यालय अनसरवाडा येथे शाळेत येळणूर व गुंजरगा येथून सुमारे ५० ते ५२ विद्यार्थी ये-जा करतात. यासाठी निलंगा येथून सकाळी निघणारी अनसरवाडा, येळणूर, गुंजरगा, चांदोरी, बोरसुरी ही गाडी बोरसुरीवरून परत फिरून येळणूर व गुंजरगा येथील विद्यार्थी घेऊन साडेनऊच्या सुमारास अनसरवाडा येथे शाळेसाठी ९:३० वाजता येते. या गाडीत बहुतांश मुली व इयत्ता नववी, दहावीचे विद्यार्थी असतात. गतवर्षीपर्यंत ही गाडी व्यवस्थित सुरू होती. उन्हाळ्याच्या सुट्या लागल्या, या दरम्यान या रस्त्यातील डांबरीकरणाचे काम सुरू झाले व ही गाडी बंद करण्यात आली व निलंगा-बोरसुरी ही सिंदखेड मार्ग सोडण्यात आली.
उन्हाळ्याच्या सुट्या असल्यामुळे बंद झालेल्या मार्गावरील गाडीचा विद्यार्थ्यांना विशेष परिणाम झाला नाही. मात्र, गुरुवारी नवीन शैक्षणिक वर्षातील शाळेचा पहिला दिवस होता. त्यामुळे येथील मुख्याध्यापक दत्ता शाहीर व ग्रामस्थांनी शाळा सुरू होण्याच्या अगोदर दोन दिवस निलंगा आगार प्रमुख अनिल बिडवे यांची भेट घेऊन बंद झालेली गाडी सुरू करा, त्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, अशी विनंती केली. मात्र, याकडे दुर्लक्ष करत शाळेच्या पहिल्या दिवशी गाडी सोडली नसल्यामुळे काही विद्यार्थी पायपीट करत एक तास उशिरा शाळेमध्ये पोहोचले. या विद्यार्थ्यांनी पुन्हा मुख्याध्यापकांकडे तक्रार करून गाडी चालू करण्यासंबंधी विनंती केली. जर गाडी चालू नाही केली तर गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षी रास्ता रोको करणार, असा इशारा येथील विद्यार्थिनीने दिला.
आगार प्रमुख अनिल बिडवे म्हणाले, मुख्याध्यापक व ग्रामस्थांच्या विनंतीला मान देऊन वाहतूक प्रमुख पवार यांना या मार्गावरील एसटी चालू करण्याबाबत सूचना केली होती. मात्र, ती का चालू करण्यात आली नाही याबाबत आपण चौकशी करून संबंधितावर योग्य ती कारवाई करू.