५० हजार ॲडव्हान्स, ५ लाखांची डील;‘नीट’ पेपर फुटीचे लातूर कनेक्शन, दुसरा शिक्षक ताब्यात!

By राजकुमार जोंधळे | Published: June 24, 2024 07:19 PM2024-06-24T19:19:11+5:302024-06-24T19:19:51+5:30

उमरगा आयटीआयतील आरोपीच्या शोधात पोलिस पथके रवाना

50 thousand advance, 5 lakhs deal; Latur connection of 'NEET' paper leak, second teacher in police custody! | ५० हजार ॲडव्हान्स, ५ लाखांची डील;‘नीट’ पेपर फुटीचे लातूर कनेक्शन, दुसरा शिक्षक ताब्यात!

५० हजार ॲडव्हान्स, ५ लाखांची डील;‘नीट’ पेपर फुटीचे लातूर कनेक्शन, दुसरा शिक्षक ताब्यात!

लातूर : नीट प्रकरणात अटक असणारा जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक जलीलखाँ उमरखान पठाण (रा. लातूर) यास सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता २ जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, दिल्लीतील आरोपीसोबत प्रवेशपत्र घेऊन ५० हजार ॲडव्हान्स आणि संपूर्ण कामाचे ५ लाखांचे डील अशा पद्धतीने व्यवहार केल्याचे संदर्भ तपासात पुढे येत असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. 

नीटमध्ये गुणवाढ करून देण्याच्या दृष्टीने दिल्लीतील आरोपी गंगाधर याच्याशी संपर्क असलेला उमरगा आयटीआयतील इरण्णा कृष्णाजी कोनगलवार (मूळ रा. देगलूर, जि. नांदेड) लातुरातील दोघा शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र मागून घेत होता. ५० हजारांत बोलणी व्हायची. पूर्ण कामाचे ५ लाख ठरायचे, अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडे आली आहे. या प्रकरणात मुख्याध्यापक असलेला आरोपी पठाण कोठडीत असून, दुसरा शिक्षक संजय तुकाराम जाधव (मूळ रा. लातूर, नोकरी सोलापूर) यास पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. तिसरा आरोपी इरण्णा याच्या शोधार्थ पथके रवाना झाली आहेत.

दुसऱ्या आरोपीची मन:स्थिती जिवाचे बरेवाईट करण्याची...
दुसरा आरोपी संजय तुकाराम जाधव याची मन:स्थिती जिवाचे बरेवाईट करण्याची दिसून आली. त्याच स्थितीत पोलिसांनी जाधव यास ताब्यात घेतले असून, चौकशी सुरू आहे. अजून तरी दप्तरी अटकेची कारवाई नाही.

पदभार दुसऱ्या शिक्षकाकडे...
अटकेत असलेला आरोपी मुख्याध्यापक जलील पठाण यास सोमवारी न्यायालयाने २ जुलैपर्यंत कोठडी सुनावली. दरम्यान, केंद्र प्रमुखाने त्याच्या कातपूर येथील जिल्हा परिषद शाळेतील कपाट सील केले असून, कामाचा पदभार दुसऱ्या शिक्षकाकडे दिला आहे. २० जूनपासून पठाण शाळेवर गैरहजर असताना २० व २१ जून रोजी मस्टरवर स्वाक्षरी केली आहे. तसा अहवाल गटशिक्षणाधिकाऱ्यांनी वरिष्ठांना पाठविला आहे. दरम्यान, अटकेसंदर्भातील कागदपत्रे प्राप्त झाल्यानंतर निलंबनाचा प्रस्ताव पाठविणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

इरण्णाची भूमिका काय?
उमरगा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नोकरीवर असलेला इरण्णा कोनगलवार लातूर येथून ये-जा करतो. सोमवार व मंगळवारची त्याने रजा टाकल्याची माहिती आहे. लातुरातील संशयित आरोपी शिक्षक हे विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे इरण्णाला पाठवीत होती. इरण्णा ती पुढे दिल्लीला गंगाधरकडे पाठवीत. या प्रकरणात तो मध्यस्थाची भूमिका वठवीत होता व त्याच्याच माध्यमातून दिल्लीशी कनेक्शन सुरू होते.

Web Title: 50 thousand advance, 5 lakhs deal; Latur connection of 'NEET' paper leak, second teacher in police custody!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.